(चिपळूण / रत्नागिरी प्रतिनिधी)
गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांची गर्दी उसळण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था पुन्हा एकदा वाहनचालकांच्या जिवाशी खेळणारी ठरत आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील आरती स्वीटसमोरील पुलावर रस्ता खचून मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या खचलेल्या भागावरून जाताना दोन वाहनांचे टायर फुटल्याची घटना घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ‘अपघात झाल्यानंतरच जागे होणार का?’ असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील सावर्डे पुलावर रस्त्याचा मोठा भाग खचल्याने वाहतुकीसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. या धोकादायक परिस्थितीची माहिती स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून संबंधित यंत्रणेला वारंवार देण्यात आली. मात्र, तातडीची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी यंत्रणेने नेहमीच्या ‘उद्या पाहू’ भूमिकेचा आधार घेतल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर नुकताच काँक्रिटचा पूर्ण पॅच टाकून दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच याच मार्गावर रस्ता खचल्याने वाहनचालकांची अक्षरशः कोंडी झाली आहे. रात्रीच्या अंधारात हा खड्डा आणि निर्माण झालेली पोकळी सहज लक्षात येत नसल्याने दुचाकीस्वारांसह चारचाकी आणि अवजड वाहनांसाठी हा भाग मृत्यूचा सापळा ठरण्याची भीती आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका वाहनचालकांना बसू लागला आहे. काल रात्री खचलेल्या भागावरून वाहन जात असताना दोन वाहनांचे टायर फुटले. सुदैवाने चालकांचे नियंत्रण सुटले नाही आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र, एखाद्या अवजड वाहनाचा अपघात झाला किंवा दुचाकीस्वार या पोकळीत सापडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत. धोक्याची तीव्रता लक्षात आल्यानंतर पोलिस प्रशासनाने रात्रीच या ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनचालकांना सतर्क केले आहे. मात्र, बॅरिकेड्स लावणे हा उपाय नव्हे; महामार्ग खचण्यामागचे कारण शोधून त्याची शास्त्रशुद्ध आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. कोकणच्या दिशेने मुंबई, पुणे आणि अन्य शहरांतून हजारो चाकरमानी वाहनांनी दाखल होणार आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा परिस्थितीत सावर्डे पुलावरील हा धोकादायक भाग अधिक गंभीर ठरू शकतो. गणेशोत्सवाच्या गर्दीपूर्वी महामार्ग सुरक्षित करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची असताना रस्ता खचूनही कायमस्वरूपी दुरुस्ती न होणे ही गंभीर बाब आहे. दुर्घटना घडल्यानंतर पंचनामा, पाहणी आणि आश्वासनांची औपचारिकता करण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे. सावर्डे पुलावरील खचलेला रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांचा जीव धोक्यात घालून महामार्गाची ‘परीक्षा’ घेण्याऐवजी प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

