(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
जयसिंगपूर शहरातील नांदणी रोड परिसरात एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. मच्छी मार्केट परिसरातील घरात ही घटना घडली. संगीता राजू गाडीवडर (२५), त्यांची मुलगी प्रगती (४) आणि मुलगा प्रतीक (दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे जयसिंगपूर शहरात खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संगीता यांचे काका दत्ता हे सायंकाळी कामावरून घरी परतले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाका मारूनही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. त्यानंतर घरात तिघेही मृतावस्थेत आढळून आले. हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी इतरांच्या मदतीने दरवाजा तोडला. आत संगीता यांनी दोन्ही मुलांसह गळफास घेतल्याचे विदारक दृश्य समोर आले. दोन्ही मुले ओढणीने तर संगीता हिने साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.
जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. संगीता हिचे माहेर कर्नाटक राज्यातील निढोणी आहे. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तिघांचे मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच संगीता यांच्या माहेरच्या नातेवाईकांनीही धाव घेतली. मृतदेह पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात घटनेच्या दिवशी दुपारी संगीता आणि त्यांच्या पतीमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या वादाचा आणि त्यानंतर घडलेल्या घटनेचा थेट संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्येमागील नेमके कारणही अद्याप समोर आलेले नाही.
जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी संगीता यांनी दोन्ही मुलांसह टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. कुटुंबीयांचे जबाब, घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत. प्रथमदर्शनी संगीता यांनी दोन्ही मुलांना गळफास देऊन स्वतः आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, याचा सर्व अंगांनी तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपअधिक्षकांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

