(नागपूर)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दोन प्रकरणांत सीबीआयकडून क्लीनचिट मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
“महाराष्ट्र पोलिसांकडून परमबीर सिंग यांच्याविरोधातील प्रकरणाचा योग्य तपास सुरू असतानाही, हे प्रकरण जाणीवपूर्वक सीबीआयकडे सोपवण्यात आलं. त्यामुळे अशा प्रकारचा निकाल लागणं अपेक्षितच होतं. परमबीर सिंग यांच्यावर काही व्यापाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. खंडणीसह खात्यातील काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचेही आरोप लावले होते. या सगळ्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी पडदा टाकला आहे,” असं मत देशमुखांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. देशमुखांनी भारतीय जनता पक्षावर थेट आरोप करत सांगितलं की, “भाजपने परमबीर सिंग यांना वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि आज त्या प्रयत्नांना यश आलं.”
जनसुरक्षा कायद्यावरूनही सरकारवर टीका
तसंच, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकत्याच पारित झालेल्या जनसुरक्षा कायद्यावर देखील नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) याने या विधेयकाला पाठिंबा दिला असून, विधेयकाविरोधात पक्षाच्या आमदारांनी कोणताही विरोध दर्शवलेला नाही. हा कायदा सरकारकडून राजकीय नेत्यांना त्रास देण्यासाठी वापरण्यात येऊ शकतो. त्यामुळे याला माझा स्पष्ट विरोध आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, “या कायद्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि डाव्या विचारसरणीचे लोक भयभीत झाले आहेत. २००४ मध्ये ईडी कायदा दहशतवाद व ड्रग माफियांविरोधात आणला गेला होता, पण आज त्याचा वापर राजकीय सूडासाठी होत आहे.”