(मुंबई)
गेल्या सात दशकांहून अधिक काळ आपल्या मधुर आवाजाने संगीतविश्व समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
काल संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने Breach Candy Hospital येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
आशा भोसले यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत विविध भाषांमध्ये तब्बल 12 हजारांहून अधिक गाणी गायली. हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी आपली अमिट छाप सोडली. त्यांच्या आवाजातील ऊर्जा, लवचिकता आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे त्या प्रत्येक पिढीच्या मनात घर करून राहिल्या.
‘दम मारो दम’, ‘रमैया वस्तावैया’, ‘ऐ मेरे हमसफर’, ‘क्या करें’ यांसारख्या असंख्य सुपरहिट गाण्यांनी त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना प्रेमाने ‘आशाताई’ म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या अद्वितीय गायकीमुळे त्यांना ‘क्वीन ऑफ इंडीपॉप’सारख्या मानाच्या उपाधीही मिळाल्या होत्या.
दरम्यान, उद्या सकाळी 11 वाजल्यापासून लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली असून, “आई आपल्यातून कायमची निघून गेली,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
आशा भोसले यांच्या निधनाने केवळ बॉलिवूडच नव्हे, तर संपूर्ण भारतीय संगीतविश्वाने एक महान, अजरामर आवाज गमावला आहे. त्यांच्या सुरांची साथ मात्र कायमच रसिकांच्या मनात जिवंत राहील.

