(मुंबई / वृत्तसंस्था)
भुलेश्वर येथे गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान ‘भुलेश्वरच्या राजा’ची मूर्ती अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांनी ADRची नोंद करून तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवशे आणि पदाधिकारी बुजेश हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मूर्ती नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
शनिवारी (२२ ऑगस्ट) रात्री भुलेश्वरच्या राजाच्या आगमनाची मिरवणूक सुरू होती. मंडपापासून सुमारे ५० ते ६० फूट अंतरावर मिरवणूक पोहोचली असताना अचानक गणेशमूर्ती कोसळली. या दुर्घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर संकेत नेवशे आणि बुजेश हेमंत जोशी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अन्य काही जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले, तर दोघांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
या घटनेची गंभीर दखल पोलीस उपायुक्त आर. रागसुधा यांनी घेतली असून, एल. टी. मार्ग पोलिसांना सखोल तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी ADR दाखल करून तपासाची प्रक्रिया सुरू केली. दुर्घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या जखमी तसेच प्रत्यक्षदर्शींची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत.
मूर्ती कोसळण्यामागे नेमकं कारण काय, याचा तपास सध्या केंद्रस्थानी आहे. मूर्तीची रचना आणि तिच्या आधारासाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी रॉडची स्थिती, वेल्डिंगचे काम पूर्ण झाले होते का, तसेच मूर्ती सुरक्षितपणे उभारण्यात आली होती का, या विविध बाबींची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. मूर्तीला मागच्या बाजूने आधार देणारे वेल्डिंग अपुरे किंवा कमकुवत असल्याचे व काही ठिकाणी नट-बोल्ट सैल झाल्याचे तसेच मूर्तीचा आधार देणारे वेल्डिंग तुटल्यामुळे दुर्घटना घडल्याची चर्चा आहे. सुरुवातीला रस्त्यावरील खड्डे किंवा ट्रॉलीचा धक्का कारणीभूत असल्याचा अंदाज वर्तवला गेला असला तरी पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत तसे मोठे खड्डे आढळले नाहीत. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणत्याही एका कारणावर शिक्कामोर्तब केलेले नाही. दुर्घटनेमागे आणखी काही तांत्रिक किंवा अन्य कारण आहे का, याचाही तपास केला जात आहे.
घटनेशी संबंधित सोशल मीडिया व्हिडीओही पोलिसांकडून तपासले जात आहेत. मिरवणुकीदरम्यान मूर्तीची स्थिती, ती कोसळण्यापूर्वी नेमकी काय परिस्थिती होती आणि दुर्घटनेच्या वेळी सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, याचा व्हिडीओच्या माध्यमातूनही मागोवा घेतला जात आहे.
दरम्यान, दुर्घटनेनंतर भुलेश्वर परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासानंतरच मूर्ती कोसळण्यामागील नेमकं कारण स्पष्ट होणार असून, त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईची दिशा निश्चित केली जाणार आहे.
घटनेबाबत माहिती देताना सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार म्हणाले, “आम्ही पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे. ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली आणि त्यामागे कोणते कारण आहे, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. गणरायाचे स्वागत आपण मोठ्या उत्साहात करतो; मात्र या उत्सवादरम्यान घडलेली ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृतांच्या तसेच जखमींच्या कुटुंबीयांना शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल.”
दुर्घटनेला नेमका कोण जबाबदार आहे आणि ही घटना कोणत्या कारणामुळे घडली, हे सध्या तपासाचा भाग असल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले. “पोलिसांच्या चौकशीनंतरच या दुर्घटनेमागील नेमके कारण आणि जबाबदारी स्पष्ट होईल,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.

