(मुंबई)
मुंबईत बोगस जन्मप्रमाणपत्रांच्या आधारे वास्तव्यास असलेल्या अनधिकृत बांगलादेशी नागरिकांविरोधात आता कडक कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा महापौर रितू तावडे यांनी दिला आहे. महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा विषय प्राधान्याने हाताळणार असल्याचं त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीला उपमहापौर संजय घाडी, माजी खासदार किरीट सोमय्या आणि मुंबई महानगरपालिका चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आतापर्यंत 267 बोगस जन्मप्रमाणपत्रे
जवळपास दीड तास चाललेल्या बैठकीत मागील साडेचार वर्षांत मोठ्या प्रमाणावर बोगस जन्मप्रमाणपत्रे जारी झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला. किरीट सोमय्या यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, आतापर्यंत किमान 267 बोगस जन्मप्रमाणपत्रे महानगरपालिकेमार्फत दिली गेली आहेत. काही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असली, तरी संबंधितांकडील मूळ प्रमाणपत्रे अद्याप जप्त करण्यात आलेली नाहीत. तपासादरम्यान काही प्रकरणांमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म झाल्याचं दाखवण्यात आलं, ती हॉस्पिटलच अस्तित्वात नसल्याचं स्पष्ट झालं. यासोबतच काही डॉक्टरांवर संगनमताने खोटी कागदपत्रे दिल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले.
एफआयआर आणि निलंबनाचे संकेत
या प्रकरणातील पुरावे पोलिसांकडे सुपूर्द करून एफआयआर नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याबद्दल महापौर रितू तावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय, फेरीवाले आणि संशयित व्यक्तींच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असून सुमारे एक हजार प्रकरणांची सखोल छाननी केली जाणार आहे. बोगस कागदपत्रे देणारे डॉक्टर, दलाल आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशाराही देण्यात आला.
“आता कारवाई थांबणार नाही” – महापौर
“इतके ठोस पुरावे असूनही कारवाई होत नसेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता बोगस जन्मप्रमाणपत्रे रद्द केली जातील, मूळ कागदपत्रे परत घेतली जातील आणि पोलीस यंत्रणेसह मोठी मोहीम राबवली जाईल,” असं रितू तावडे म्हणाल्या.
सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण, बेकायदेशीर फेरीवाले आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल. “मुंबईकरांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
किरीट सोमय्यांचा दावा काय?
किरीट सोमय्या यांनी सांगितलं की, जन्मप्रमाणपत्र असूनही भारतात जन्म झाल्याचा ठोस पुरावा नसलेल्या संशयित व्यक्तींवर सध्या विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे. अशा अनेक प्रकरणांची सविस्तर माहिती महानगरपालिकेला देण्यात आली असून, गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. महानगरपालिकेतील “माफिया राज” संपण्याची ही सुरुवात असल्याचा दावा त्यांनी केला. मुंब्रा परिसरातून बांगलादेशी नेटवर्क चालवलं जात असल्याची उदाहरणे देत, सुमारे 100 डॉक्टरांची माहिती प्रशासनाकडे दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
उपमहापौरांचा इशारा
उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितलं की, प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या हॉस्पिटलमध्ये जन्म दाखवून बोगस डॉक्टरांकडून प्रमाणपत्रे दिल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशा नेटवर्कच्या आधारे मिळवलेल्या सर्व प्रमाणपत्रांची कठोर चौकशी केली जाईल. 2024–25 या कालावधीत ही प्रकरणे मोठ्या प्रमाणावर घडल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे.
या प्रकरणामुळे मुंबईतील बोगस कागदपत्रांच्या रॅकेटवर मोठी कारवाई होण्याची शक्यता असून, येत्या काळात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

