(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या घटनेमागील नेमकी कारणे काय होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कुणाल चांदगुडे (१९), त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (४८) आणि आई संगीता चांदगुडे (४२) यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील अंतर्गत वाद, संपत्ती, शेती, नातेसंबंध आणि मोबाईलच्या हप्त्याशी संबंधित चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. मात्र, या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांनीही केवळ मोबाईलचा मुद्दा हेच घटनेमागचे कारण असल्याचे स्पष्ट झालेले नसल्याचे सांगितले आहे.
शुक्रवारी घडलेल्या या घटनेत कुणाल खवड्या डोंगर परिसरात गेला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे आई-वडील आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. काही काळ त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर कुणालला वाचवण्याच्या प्रयत्नात मुरलीधर दरीत कोसळले. पती आणि मुलगा दरीत पडल्याचे पाहून संगीता यांनीही टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या दुर्घटनेत तिघांचाही मृत्यू झाला.
कुणाल हा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत होता आणि NEET-UG परीक्षेची तयारी करत होता. त्याचे वडील ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करत होते. काही दिवसांपासून कुणाल आणि वडिलांमध्ये मतभेद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, या मतभेदांचे नेमके स्वरूप आणि त्यांचा घटनेशी काही संबंध होता का, याचा तपास सुरू आहे.
चांदगुडे कुटुंब काही महिन्यांपूर्वी देवळाई परिसरातून झाल्टा फाटा भागात राहण्यासाठी आले होते. गेल्या काही काळापासून कुटुंबात कुरबुरी सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. संगीता यांनी सोशल मीडियावर संपत्ती, शेती, मुलगा आणि काही नातेवाईकांचा उल्लेख असलेले व्हिडीओ पोस्ट केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या पोस्टच्या पार्श्वभूमीचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, तिघांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही कुटुंबातील दुराव्याचे चित्र दिसून आले. मुरलीधर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी धनगर पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, तर संगीता आणि कुणाल यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेनंतर सोशल मीडियावर कुणालला मोबाईल किंवा आयफोन न मिळाल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, या दाव्यांना कुटुंबीयांनी तीव्र विरोध केला आहे. कुणालची मावशी पल्लवी पाटील यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून घटनेची सत्य माहिती नसताना कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा अपूर्ण माहिती पसरवू नये, असे आवाहन केले आहे.
पल्लवी पाटील यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले की, कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असताना सोशल मीडियावर एकामागून एक व्हिडीओ आणि दावे पाहायला मिळत आहेत. घटनेची पूर्ण माहिती नसताना कुणाल, त्याचे आई-वडील किंवा त्यांच्या कुटुंबाबाबत चुकीचे निष्कर्ष काढू नयेत, अशी विनंती त्यांनी केली.
त्यांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांचाही विचार करण्याचे आवाहन केले. चार बहिणींच्या कुटुंबातील मोठे दुःख असल्याचे सांगताना पल्लवी पाटील यांनी आई-वडिलांचे वय ७५ वर्षांपेक्षा अधिक असल्याचे नमूद केले. नातवाला आणि मुलीला गमावल्याचा धक्का त्यांनाही सहन करावा लागत असल्याने सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी कुटुंबाच्या भावनांचा विचार करावा, असे त्यांनी म्हटले.
कुणालचा लाडका पाळीव श्वान ‘शेरू’ही या घटनेनंतर एकटा पडला आहे. गेल्या सहा वर्षांपासून कुणाल शेरूचा सांभाळ करत होता. घटनेनंतर शेरू घरात एकटा असल्याचे पाहून कुटुंबीय भावूक झाले. कुणालच्या आजोबांनी शेरूला बिस्किटे भरवताना नातवाच्या आठवणीने डोळे पाणावल्याचेही समोर आले आहे. कुणालच्या आठवणींसोबत शेरूचीही जबाबदारी घेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.
दुसरीकडे, संगीता यांचे वडील बबनराव गाभूड यांनी घटनेच्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमाबाबत महत्त्वाचा दावा केला आहे. कुणाल चांदगुडे हा खवड्या डोंगरावरील कड्यावर गेल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी कुटुंबीय आणि पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. यावेळी संगीता यांनी मुलाला शांत करण्यासाठी आणि त्याला सुरक्षितपणे परत येण्यासाठी वारंवार विनंती केल्याचे घटनास्थळी असलेल्या व्हिडीओमधून दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. आईने मुलाला भावनिक आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत त्याने सुरक्षिततेसाठी थोडे पुढे यावे, अशी विनंती केल्याचेही समोर आले आहे.
कुणाल आणि त्याचे वडील मुरलीधर यांच्यात काही दिवसांपासून मतभेद असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. या पार्श्वभूमीवर संगीता यांनी मुलाची समजूत काढताना कुटुंबातील वाद संपवण्याची तयारी दर्शवली होती, असा दावा त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. आई सगळ्या परीने प्रयत्न करत होती. अगदी तिने तुझा पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ मी आताच मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघं राहू, पण मला सोडून जाऊ नकोस, आई तिला जे काही सुचत होतं ते सगळं प्रयत्न करत होती. मुलाला सुरक्षित परत आणण्यासाठी संगीता यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, संगीता यांचे वडील बबनराव गाभूड यांनी या संपूर्ण घटनाक्रमाबाबत महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुणालला कड्यावरून सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी त्याची आई आणि पोलिसांकडून शांतपणे समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचवेळी मुरलीधर यांनी कुणालला पकडण्यासाठी घाईने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान दोघांचा तोल गेला आणि ते दरीत कोसळले, असा दावा गाभूड यांनी केला आहे.
मुरलीधर आणि कुणाल दरीत कोसळल्याचे पाहिल्यानंतर संगीता यांना मोठा धक्का बसला आणि त्यानंतर त्यांनीही टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेनंतर चांदगुडे कुटुंबातील कौटुंबिक संबंध, पती-पत्नीमधील वाद तसेच संगीता यांनी सोशल मीडियावर केलेल्या काही पोस्ट यांचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणामागे नेमकी कोणती कौटुंबिक आणि मानसिक पार्श्वभूमी होती, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, कुणालच्या मृत्यूमागे केवळ मोबाईल किंवा आर्थिक कारण होते का, याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. कुटुंबातील सदस्यांचे जबाब, सोशल मीडिया पोस्ट आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास केला जात आहे. “कुणालने टोकाचा निर्णय घेण्यामागे केवळ मोबाईल हेच कारण होते, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. त्यामागे अनेक कारणे असण्याची शक्यता आहे. दोन्ही कुटुंबांचे जबाब नोंदवून प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल,” अशी माहिती पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली. त्यामुळे खवड्या डोंगरावरील या दुर्दैवी घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी काय होती, कौटुंबिक वादाचा त्यात किती संबंध होता हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.


