(मुंबई)
राज्याच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक ठरला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला. त्यांच्या या नियुक्तीमुळे राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाला असून महिला नेतृत्वाच्या दृष्टीने हा क्षण अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याने आजचा दिवस राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक आणि भावनिक ठरला आहे.
उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या नियुक्तीमुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
कार्यभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मंत्रालयात प्रवेश केला. मंत्रालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी विविध खात्यांचा पदभार स्वीकारत प्रशासनाशी संवाद साधला आणि समन्वयाने काम करण्यावर भर दिला.
सुनेत्रा पवार यांची सामाजिक प्रश्नांबाबतची संवेदनशील भूमिका, महिलांच्या प्रश्नांवरील सकारात्मक भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्या कायम चर्चेत राहिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे निर्णयप्रक्रियेत महिलांचे प्रतिनिधित्व अधिक बळकट होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री पद भूषवले असलेतरी आता प्रथमच एखाद्या महिलेला ही जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे ही नियुक्ती केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
राज्यातील महिला, युवती आणि नव्या पिढीतील नेतृत्वासाठी सुनेत्रा पवार यांची ही नियुक्ती प्रेरणादायी ठरणार असून, महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

