(राजापूर /तुषार पाचलकर)
राजापूर तालुका केमिस्ट संघटनेच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल लांजेकर, तर सचिवपदी कात्रादेवी-सागवे विभागातील रिटेलर रमाकांत मोंडे यांची निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष एजाजभाई पन्हळेकर यांनी राजीनामा दिल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्या पदावर प्रफुल्ल लांजेकर यांची निवड करण्यात आली. तसेच लांजेकर यांच्या सचिवपदाच्या रिक्त जागी रमाकांत मोंडे यांची निवड करण्यात आली.
राजापूर येथील यशोदीन मंगल कार्यालयात तालुका केमिस्ट संघटनेची सर्वसाधारण सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदीप वळंजू होते. यावेळी संघटनेच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष प्रफुल्ल लांजेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. संघटनेने सोपविलेली नवीन जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहू, तसेच संघटनेच्या कामकाजासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सभेच्या अखेरीस मजिद पन्हळेकर यांनी आभारप्रदर्शन केले.

