(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील दुर्गम ओझर गावात मर्यादित सोयी-सुविधा उपलब्ध असतानाही जिल्हा परिषद शाळा ओझर नं. १ ने क्रीडा क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवत खेळाच्या माध्यमातून त्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकास साधण्याचा वेगळा उपक्रम शाळेत राबविला जात आहे.
गतवर्षी शाळेतील १० ते ११ विद्यार्थ्यांनी अथलीट, योगा आणि रग्बी या क्रीडा प्रकारांच्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. यंदाही विद्यार्थ्यांनी ही क्रीडा परंपरा पुढे नेत विभागीय आणि राज्यस्तरावर झेप घेतली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुका, जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध वैयक्तिक तसेच सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होणारी जिल्हा परिषदेची एकमेव शाळा म्हणून ओझर शाळेचा उल्लेख केला जात आहे.
असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांसह शालेय क्रीडा स्पर्धांमध्येही या शाळेतील खेळाडू सातत्याने सहभागी होत आहेत. आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी राज्यस्तरावरही ठसा उमटविला आहे. दुर्वा मंगेश गुरव, पल्लवी पांडुरंग मालपेकर, श्रुती नरेश पळसमकर, अनन्या विवेक रेगे, दुर्वा सतीश रेगे, वैदही योगेश नवलू, काव्या उमेश रांबाडे, हाजीरा रिजवान नेवरेकर, आरोही संजय नवलू, आरोही नितीन भेरे, रिया प्रकाश नवलू, उर्वी अनंत गोसावी, साई राजेश गुरव, सार्थक जयेंद्र मालपेकर, आयमान असिफ गडकरी, मोहम्मदरुमान रशीद गडकरी, आजम रिजवान नेवरेकर, आर्य नितीन भेरे, हर्षल अनंत गोसावी, विघ्नेश बापू पांचाळ, पियुष दिलीप मालपेकर आणि गौरेश नरेंद्र राणे या विद्यार्थ्यांनी योगा, रग्बी आणि अथलीट या क्रीडा प्रकारांमध्ये विशेष कौशल्य प्राप्त केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या क्रीडा यशामागे मुख्य प्रशिक्षक श्री. युवराज मोरे, सहायक प्रशिक्षक श्री. शैलेंद्र बंदसोडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामचंद्र मोरे, शाळेतील शिक्षक व कबड्डी राष्ट्रीय पंच मा. श्री. दत्तात्रय गायकवाड, शिक्षक श्री. सतीश पाटील, शिक्षिका सौ. किशोरी पाटील, श्री. संदीप चव्हाण, माजी शिक्षक श्री. संजय चौगुले आणि श्री. राजेंद्र इंगळे यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरत आहे.
विद्यार्थी, प्रशिक्षक आणि शिक्षकांच्या पाठीशी गावचे सरपंच श्री. विकासजी रेगे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. मानसी गुरव, ग्रामपंचायत सदस्य श्री. जहीरभाई टोले, उपाध्यक्ष श्री. निलेश कुर्ले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, व्यवस्थापन समिती सदस्य, पालक आणि ग्रामस्थ खंबीरपणे उभे आहेत. दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे.


