(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, काळबादेवी येथील विद्यार्थ्यांनी रामेश्वर मंदिरात सुरेल भजन व भक्तिगीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या मधुर स्वरांनी आणि तालबद्ध सादरीकरणाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
शाळेच्या ‘आनंददायी शनिवार’ आणि ‘मैत्री स्वरांशी’ या उपक्रमांतर्गत या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष सादरीकरणापर्यंत शाळेचे मुख्याध्यापक श्री. भुवड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय श्लोक आणि गणेशवंदनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘रूप पाहता लोचनी’, ‘विठ्ठल नामाची शाळा भरली’, ‘ये भोळ्या शंकरा’, ‘शंकराला माझा’ यांसारखी भक्तिगीते व अभंग सादर केले. यासोबतच विद्यार्थ्यांनी सुंदर गवळणही सादर केली. आत्मविश्वासाने, सुरेल आवाजात आणि उत्तम ताल-लयीत केलेल्या या सादरीकरणाला उपस्थित पालक, ग्रामस्थ आणि भाविकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
सुमारे तासभर रंगलेल्या या भक्तिमय कार्यक्रमामुळे रामेश्वर मंदिर परिसरातील वातावरण अधिकच प्रसन्न आणि मंगलमय झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत उपस्थित पालक व ग्रामस्थांनी शाळेच्या या उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना संगीताची गोडी लागावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, आत्मविश्वास वाढावा तसेच भारतीय संस्कृती, संतपरंपरा आणि भक्तिसंगीताची ओळख व्हावी, या उद्देशाने शाळेत अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत असून, त्यांना अभ्यासाबरोबरच कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे.
विद्यार्थ्यांना सुंदर मार्गदर्शन करून त्यांची तयारी करून घेतल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. भुवड, पदवीधर शिक्षक श्री. आरेकर आणि उपशिक्षिका सौ. वैशाली झोरे यांचे उपस्थित पालक व ग्रामस्थांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

