(रत्नागिरी / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील जुवाठी येथे नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ आयोजित कोकण विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत कास्यपदक पटकावले. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाचा खेळाडू सिद्धेश मंगेश फणसेकर याची कोकण विभागीय बॅडमिंटन संघात सलग चौथ्या वर्षी निवड झाली आहे. त्याच्यासोबत आदित्य शिर्के याचीही कोकण विभागीय संघात निवड झाली असून, दोघेही आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोकण विभागातून या स्पर्धेत एकूण १७ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करत कास्यपदक मिळवले. महाविद्यालयाच्या संघात सिद्धेश फणसेकर, आदित्य शिर्के, शौनक भावे, अथर्व कारेकर, परेश तळेकर, आकाश पालवे आणि सलील कांबळे यांचा समावेश होता.
स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे सिद्धेश फणसेकर आणि आदित्य शिर्के यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोकण विभागीय संघात निवड करण्यात आली आहे. सिद्धेशची कोकण विभागीय संघात सलग चौथ्या वर्षी निवड होणे ही विशेष उल्लेखनीय बाब मानली जात आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने विभागीय स्तरावर आपले स्थान कायम राखले आहे.
सिद्धेशच्या या यशाबद्दल रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांकडून त्याचे अभिनंदन होत आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही सिद्धेश आणि आदित्य यांनी उत्तम कामगिरी करून कोकण विभागाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

