(रत्नागिरी / वार्ताहर)
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये घरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, ईद-ए-मिलादनिमित्त धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २६ ऑगस्ट रोजी रत्नागिरी शहरातून भव्य जुलूस (रॅली) काढण्यात येणार आहे.
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलाद साजरी केली जाते. इस्लामी कालगणनेनुसार रबिउल अव्वल महिन्यात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव नमाज पठण, कुराण पठण तसेच नात पठण करून प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनकार्याचे स्मरण करतात.
रत्नागिरी शहरात २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता जुलूसला सुरुवात होणार आहे. कोकणनगर येथून सुरू होणारा हा जुलूस नगर, मारुती मंदिर, उद्यमनगर, चंपक मैदान या मार्गाने पुढे जात पुन्हा कोकणनगर येथे समाप्त होणार आहे. या जुलूसमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरीचे अध्यक्ष अल्ताफ कुरेशी यांनी केले आहे.
ईद-ए-मिलादनिमित्त कोकणनगर परिसरात लहान मुलांसाठीही विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता ही रॅली काढण्यात येणार असून, त्यात परिसरातील लहान मुले सहभागी होणार आहेत.
दरम्यान, ईद-ए-मिलादचे औचित्य साधून मुस्लिम महिलांसाठीही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत मेमन समाज हॉल येथे महिलांसाठी इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ईद-ए-मिलादच्या निमित्ताने शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या तयारीमुळे रत्नागिरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देत हा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याची तयारी मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे.

