(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील खेडशी व हातखंबा तिठा परिसरात रात्रीच्या वेळी बलदंड बिबट्याचा मुक्त संचार वाढत असून ग्रामस्थांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास हातखंबा (तिठा) येथील सुनील कांबळे यांच्या घराजवळ बिबट्या दिसताच एकच खळबळ उडाली. घराजवळ रक्षणासाठी बसलेले कुत्रे बिबट्याला पाहताच पळ काढल्याने शिकार बनण्याचा अनर्थ टळला आहे. मात्र या भागात बिबट्याची दहशत शिगेला पोहचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बलदंड बिबट्या खेडशी परिसरात फिरत असल्याचे अनेकदा CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. मात्र आता हातखंबा महामार्गालगतच्या घरांपर्यंत त्याचा वावर पोहोचल्याची नोंदही शनिवारी 14 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री झाली आहे. ग्रामस्थांनी खेडशी ग्रामपंचायतीमार्फत वनविभागाला बिबट्याला पकडण्यासाठी लेखी सूचना दिल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी, मध्यरात्री उच्छाद मांडणाऱ्या या बलदंड बिबट्याला जेरबंद करण्यात रत्नागिरी वनविभागाचे अधिकारी अपयशी ठरत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
खेडशी आणि हातखंबा परिसरात बलदंड बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. सलग काही दिवस बिबट्या वस्तीत व घरांच्या उंबरठ्यापर्यंत फिरताना दिसत असून दोन्ही गावांमधील ग्रामस्थ भयभीत आहेत. मात्र या स्थितीकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या माणसांवर हल्ला होण्याची वाट वनविभागाचे अधिकारी पाहत आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. रात्री-अपरात्री बिबट्याचा वावर स्पष्ट असून मनुष्यहानीची शक्यता नाकारता येत नाही. तरीही आवश्यक त्या ट्रॅप, पिंजरे किंवा देखरेखीची साधने बसविण्यासंदर्भात वनविभागाची कारवाई अत्यंत ढिसाळ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ट्रॅप कॅमेरे व पिंजरे तातडीने बसवावेत
बिबट्याचा वावर केवळ खेडशीपुरता मर्यादित नसून महामार्गालगतच्या वस्त्यांमध्ये त्याने मोठ्या धाडसाने प्रवेश केला आहे. संभाव्य मनुष्यहानीचा धोका लक्षात घेता वनविभागाने “हल्ला होईल तेव्हा पाहू” अशी भूमिका न घेता तातडीने ट्रॅप कॅमेरे, पिंजरे बसवून बिबट्याला पकडावे, अशी मागणी आता हातखंबा येथील ग्रामस्थ अमोल कांबळे यांनी केली आहे.
संधी मिळूनही वनविभागाच्या तावडीतून बिबट्या निसटला…
दोन महिन्यांपूर्वी खेडशी येथील एका ग्रामस्थाच्या घराजवळील भाजीपाला बागेत उभारलेल्या ग्रीनशेडमध्ये बिबट्या अडकून फसला होता. बिबट्या असल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी मध्यरात्री वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सोबत पिंजरा न आणता रिकाम्या हाती घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन तासांनी संगमेश्वर येथील तुरळ भागात असलेला पिंजरा घेऊन कर्मचारी खेडशी भागात पोहोचले. यावेळी तब्बल दोन तास सुरू असलेल्या या थरारादरम्यान ग्रामस्थांनी जीव मुठीत धरला होता. संधी मिळूनही वनविभागाला बिबट्याला पकडण्यात सपशेल अपयश आले आणि तो त्यांच्या तावडीतून निसटला. या प्रकरणाने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र वारंवार हातखंबा आणि खेडशी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढत असताना सुद्धा त्याला जेरबंद करण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष का होतेय? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

