(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीत योग्य तो समन्वय राखत भाजपाला सन्मानजनक प्रतिनिधित्व मिळवून देण्यात यश आले असून, याच समन्वयामुळे जिल्ह्यात महायुतीचा विराट विजय साकारला, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अनिकेत पटवर्धन यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या नियोजनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या ३९ उमेदवारांपैकी ३६ उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच २ पैकी २ नगराध्यक्षपदे भाजपने जिंकली आहेत. महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेतर्फे उभे करण्यात आलेल्या ९ भाजप उमेदवारांपैकी ७ उमेदवार विजयी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
जागावाटपावर दूरदृष्टी, २०२९ चा विचार!
रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक मतमोजणीदरम्यान पत्रकारांशी बोलताना अनिकेत पटवर्धन म्हणाले की, भाजपाला कमी जागा देण्यात आल्याची टीका झाली. मात्र, जागावाटपात दीर्घकालीन दूरदृष्टी ठेवली होती. २०२९ मधील लोकसभा, विधानसभा, कोकण पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकांचा विचार करूनच ही महायुती करण्यात आली आणि ती पूर्णतः यशस्वी ठरली.
महायुती टिकवण्यासाठी मंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवत समन्वय साधण्यात आला. सत्तेत सहभाग आणि पक्षाचा सन्मान या दोन्ही बाबी साध्य करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये एकूण १५१ नगरसेवक पदांच्या जागा असून, त्यापैकी ३९ जागा भाजपला मिळाल्या आहेत. जिल्ह्यात कुठेही भाजपची ताकद कमी झालेली नसून, सर्व ठिकाणी महायुती अभेद्य असल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले.
कोकणात भाजपासाठी चांगले दिवस!
४७ वर्षांनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपने जिंकला असून, ही जागा कायम भाजपकडे राहावी, हा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. २०२९ पर्यंत कोकणात भाजप आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजप यंग ब्रिगेडला संधी; अनेकांचा प्रवेश अपेक्षित
भविष्यात भाजपमध्ये नवीन व तरुण नेतृत्वाला संधी दिली जाणार असून, ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत पक्ष पुढील २५ वर्षे सक्षमपणे कार्य करेल, असे पटवर्धन यांनी सांगितले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत महायुतीच्या माध्यमातून भाजपाचे किमान १० जिल्हा परिषद व २० पंचायत समिती सदस्य विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

