(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या संघटनात्मक विस्ताराला चालना देण्याच्या दृष्टीने अनुभवी सामाजिक कार्यकर्ते सी. आर. कांबळे यांची कोकण प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चिपळूण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या हस्ते कांबळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चेडे, कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ, पर्यावरण आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तांबे, जिल्हा युवक अध्यक्ष प्रशितोष कदम, जिल्हा उपाध्यक्ष विजू आप्पा, मारुती मोहिते, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, तालुका सरचिटणीस उमेश सकपाळ, गुहागर तालुकाध्यक्ष संदीप कदम, खेड तालुकाध्यक्ष बाबाराव पवार, तालुका सरचिटणीस जितेंद्र तांबे तसेच दापोली-मंडणगड तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शासकीय सेवेत प्रदीर्घ अनुभव लाभलेले सी. आर. कांबळे हे कर्मचारी संघटनांबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत. त्यांनी एलएलबी पदवी संपादन केली असून सध्या एलएलएमचे शिक्षण घेत आहेत. अभ्यासू वृत्ती, प्रभावी वक्तृत्व, संघटन कौशल्य आणि सर्वसामान्यांशी असलेला सातत्यपूर्ण संवाद या गुणांच्या बळावर त्यांनी सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याच कार्याचा गौरव म्हणून पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कांबळे यांच्या नियुक्तीमुळे कोकणातील पक्ष संघटना अधिक बळकट होईल, विचारधारेचा प्रसार तळागाळापर्यंत पोहोचेल आणि नव्या कार्यकर्त्यांना सक्षम नेतृत्व मिळेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. दरम्यान, त्यांच्या नियुक्तीचे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातून स्वागत होत असून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

