(राजापूर / वार्ताहर)
तालुक्यातील केळवली फाटा येथील जामदे पुलाजवळ आज (शनिवार) सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील तिघे जखमी झाले असून, एसटी बसने कारला धडक दिल्यानंतर ती काही अंतरापर्यंत फरफटत गेली. मात्र, कारचालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातात एसटी बस आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या प्रकरणी कारचालक अमित रमेश साटम (रा. शिरगाव, ता. देवगड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एसटी चालक गणपती भाऊसाहेब जाधव (वय ४७) यांच्याविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात युधीराज भिकाजी राणे (वय ३२), विघ्नेश रामदास म्हाळवदे (वय २५) आणि राज रामदास म्हाळवदे (वय २२) हे तिघे जखमी झाले. तिघेही शिरगाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित साटम हे आपल्या मित्रांसह स्विफ्ट डिझायर कार (एमएच ०७ बीजी ९०९७) घेऊन शिरगाव, देवगड येथून पुण्याच्या दिशेने निघाले होते. ते केळवली-पाचल मार्गे अणुस्कुराच्या दिशेने जात होते. याचवेळी वैभववाडीच्या दिशेने कणकवली आगाराची भुईबावडा-रिंगेवाडी-खारेपाटण मार्गावरील एसटी बस (एमएच २० बीएल ३०७९) येत होती. ही बस चालक गणपती जाधव यांच्या ताब्यात होती, तर दशरथ गोविंद जाधव हे वाहक म्हणून कार्यरत होते.
केळवली फाट्यावरील जामदे पुलाजवळ वळणाचा रस्ता असताना एसटी चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे योग्य लक्ष न देता बस भरधाव वेगाने चालविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी बसने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार काही अंतरापर्यंत एसटी बससोबत फरफटत गेली. या अपघातात कारमधील तिघांना दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल रहीम मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. राजापूर आगारप्रमुख काव्या पेडणेकर, वाहतूक नियंत्रक अजय सिडाम तसेच सिंधुदुर्गचे विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड यांनी घटनास्थळी पाहणी केली.
या अपघातात एसटी बसचे सुमारे ४० हजार रुपये, तर स्विफ्ट डिझायर कारचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी राजापूर पोलिसांनी एसटी चालक गणपती जाधव यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अपघाताच्या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलिस करत आहेत.

