(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील नाटे येथील विद्यामंदिर व कला-वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयातील शालेय पोषण आहार योजनेत अनियमितता व धान्य चोरी झाल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. या गंभीर गैरप्रकारांमुळे मुख्याध्यापक आणि उपशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषद रत्नागिरीच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किरण लोहार यांनी १० नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, मुख्याध्यापक रविंद्र तानु जाधव आणि उपशिक्षक नाना बिरा करे, नाटे नगर विद्यामंदिर व कला-वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय, यांना निलंबित करण्याचे निर्देश ग्रामपंचायत नाटे (संस्थाप्रमुख) यांना देण्यात आले. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती राजापूर यांनी सादर केलेल्या सखोल चौकशी अहवालासह सागरी पोलिस ठाणे, नाटे येथील प्रथम खबर अहवालाच्या आधारे ही कारवाई निश्चित करण्यात आली आहे.
अहवालानुसार, शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्य वितरणात अनियमितता, लेखापरीक्षणातील विसंगती तसेच धान्य चोरीसारखे गंभीर गैरवर्तन संबंधित शिक्षकांच्या विरोधात स्पष्टपणे दिसून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या योजनेत झालेली ही गडबड अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ मधील नियम क्रमांक २८(५)(अ)(क)(१) तसेच नियम ३३(१)(५)(६) अन्वये निलंबनाची कारवाई आवश्यक असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. संस्थेने तातडीने निलंबनाची कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा, अशाही सूचनाही शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिल्या आहेत.

