(राजापूर)
तालुक्यातील डोंगर दत्तवाडी येथे कौटुंबिक जमीन आणि सामाईक घरावरील जुन्या वादातून संतापाच्या भरात सख्या जावेने दुसऱ्या जावेच्या डोक्यात सोललेला नारळ फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एक महिला जखमी झाली असून, राजापूर पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास डोंगर दत्तवाडी येथे घडली. याप्रकरणी संजिवनी संतोष कामतेकर (वय ४७, रा. डोंगर दत्तवाडी) यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी आणि संशयित आरोपी महिला या नात्याने सख्या जाऊ असून, गेल्या काही दिवसांपासून जमीनजुमल्यावरून तसेच सामाईक घराच्या वाटणीवरून दोघींमध्ये वाद सुरू होता.
घटनेच्या दिवशी संजिवनी कामतेकर या त्यांच्या शेतातील नाचणीचे गोडण सुकवण्यासाठी जुन्या घराच्या ‘व्हाईनावर’ गेल्या होत्या. त्याचवेळी संशयित आरोपी महिला तेथे उपस्थित होती. संजिवनी यांना पाहताच संशयित आरोपीने त्यांच्याशी वाद घालत अश्लील शिवीगाळ केली. ‘तू इथे कशाला आलीस? तुझ्या घरात जा,’ असे म्हणत ती संतापली. त्यावर संजिवनी यांनी प्रतिप्रश्न केला असता संशयित आरोपीचा पारा आणखी चढला. रागाच्या भरात आरोपीने घरात धाव घेतली आणि तेथे ठेवलेला सोललेला नारळ हातात घेऊन येत संजिवनी कामतेकर यांच्या डोक्यात डाव्या बाजूला जोरात फेकून मारला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता संशयित आरोपीने फिर्यादीला ठार मारण्याची धमकीही दिली, असे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेची नोंद राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०६/२०२५ अंतर्गत करण्यात आली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी महिलेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ११८(१), ३५२ (हल्ला) आणि ३५१(१) (इजा पोहोचवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जखमी संजिवनी कामतेकर यांच्यावर उपचार सुरू असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या गंभीर हल्ल्यामुळे डोंगर दत्तवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

