(राजापूर / तुषार पाचलकर)
“तू कुठला?” असा प्रश्न जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणी विचारला, की छाती अभिमानाने भरून येते आणि ओठांवर सहज उमटते ते एकच नाव… “पाचल!” जन्मभूमी कोणतीही असो, पण कर्मभूमी म्हणून पाचलचे नाव घेताना मन अभिमानाने भरून येते, असे मत सामाजिक कार्यकर्ते नारायण पांचाळ यांनी व्यक्त केले.
त्यांच्या मते, पाचल हे केवळ एक गाव नाही, तर एक विचार, एक संस्कार आणि एक ओळख आहे. स्वातंत्र्यलढ्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या या भूमीत क्रांतिकारकांच्या पाऊलखुणा आजही जपल्या गेल्या आहेत. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची प्रेरणा आजही येथील पिढ्यांना दिशा देत आहे.
ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या सरस्वती विद्या मंदिर या शाळेने हजारो विद्यार्थी घडवले. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रांत यशस्वी होत पाचलचे नाव उज्ज्वल करत आहेत. पाटी-पेन्सिलपासून सुरू झालेला हा प्रवास आज आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत पोहोचला असला, तरी त्याची पाळेमुळे पाचलच्या मातीतच रुजलेली आहेत.
पाचलोबाच्या पावन भूमीने पंचक्रोशीला केवळ जोडले नाही, तर घडवले आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात नाव कमावणाऱ्या अनेक व्यक्तिमत्त्वांची जडणघडण याच मातीत झाली. एकेकाळी पाचलच्या कट्ट्यावर होणाऱ्या चर्चांचा प्रभाव जिल्ह्याच्या राजकारणावर पडत असे. समाजहितासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाव किंवा पदासाठी नव्हे, तर पंचक्रोशीच्या विकासासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या त्यागाचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे.
आजचे पाचल झपाट्याने बदलत आहे. गावाचे रूपांतर आधुनिक बाजारपेठेत होत असले, तरी संस्कृती, परंपरा आणि मातीचा सुगंध कायम आहे. एकेकाळी मुंबईहून एसटीच्या टपावर संसारोपयोगी साहित्य घेऊन येणारे चाकरमानी आज पाचलमध्येच सर्व आवश्यक वस्तू सहज उपलब्ध होत असल्याने निर्धास्तपणे गावी येतात. पिठापासून कपड्यांपर्यंत, इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून मोबाईलपर्यंत सर्व काही येथे उपलब्ध असल्याने अनेकजण पाचलला प्रेमाने “मिनी मुंबई” असे संबोधतात.
पाचलची चविष्ट मिसळ आणि वडापाव हेही परिसराचे विशेष आकर्षण ठरले आहे. तसेच प्रत्येक बुधवारी भरणारा आठवडा बाजार हा पंचक्रोशीतील आर्थिक व्यवहारांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनला आहे. लाखो रुपयांची उलाढाल होणारा हा बाजार दिवसेंदिवस अधिक गजबजत असून, त्याची दखल शासनालाही घ्यावी लागत आहे.
शहरीकरणाच्या वाढत्या प्रक्रियेमुळे रोजगार, व्यापार आणि छोट्या उद्योगांसाठी अनेकजण पाचलची निवड करत आहेत. जसे मुंबईने प्रत्येक कष्टकरी माणसाला आपलेसे केले, तसेच पाचलही सर्वांना सामावून घेत आहे. हीच या गावाची खरी ताकद असल्याचे नारायण पांचाळ यांनी नमूद केले.
मात्र, या सर्व प्रगतीसोबत एक खंतही त्यांनी व्यक्त केली. समृद्ध राजकीय वारसा, सक्षम कार्यकर्ते आणि विविध विकासकामांमध्ये योगदान असूनही पाचलच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आजपर्यंत विधानभवनात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. पंचायतीपासून मंत्रालयापर्यंत धावणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना आमदार किंवा खासदार म्हणून संधी मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“पाचल पंचक्रोशीचा विकास म्हणजे आमचा विकास” हे केवळ घोषवाक्य नसून येथील प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आणि कृतीत रुजलेले वास्तव आहे. त्यामुळेच, “जन्मभूमी कोणतीही असो; पण कर्मभूमी पाचलच,” असे ठामपणे सांगताना आजही उर अभिमानाने भरून येतो, अशा शब्दांत नारायण पांचाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

