(राजापूर)
तालुक्यातील गावेलकरवाडी येथे पोलिसांनी विक्रीसाठी साठवून ठेवलेला गोवा बनावटी दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संजना संजय गावेलकर (वय ३५, रा. गावेलकरवाडी-देवाचेगोठणे, राजापूर) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाटे पोलिसांनी रविवारी सायंकाळी ही कारवाई केली.
कॉन्स्टेबल दामिनी पेडणेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित महिलेच्या घराच्या पाठीमागील पडवीत एका कोपऱ्यात गोवा बनावटीच्या गैरकायदा दारूच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. तपासादरम्यान पोलिसांना तेथे ८२० रुपयांच्या ३० बाटल्या आढळून आल्या. या सर्व बाटल्या पोलिसांनी ताब्यात घेत जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नाटे पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

