(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय आणि बाबाराम परशराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाचनालयाला मुंबई येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक व नामांकित नाट्यकलाकार महेंद्र तुकाराम कदम आणि सौ. वैशाली महेंद्र कदम यांनी विविध विषयांवरील २० दर्जेदार पुस्तकांची भेट दिली.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा व्यासंग वाढावा आणि विविध क्षेत्रांतील ज्ञानाचा परिचय व्हावा, या उद्देशाने ही पुस्तकांची देणगी देण्यात आली.
महेंद्र तुकाराम कदम हे ‘गुण्यागोविंदाने’ या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी तसेच ‘मंथन ऑर्केस्ट्रा’मधील आपल्या कलाविष्कारासाठी परिचित आहेत. कला, विज्ञान, चित्रपट तसेच विविध महापुरुषांच्या जीवनावर आधारित आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी निवडक पुस्तके त्यांनी विद्यालयाला भेट दिली.
महेंद्र कदम आणि वैशाली कदम यांना अभिनय व कलेची विशेष आवड असून विद्यार्थ्यांमधील अंगभूत कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि कलाक्षेत्राकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी विकसित व्हावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. ‘मनोरंजक शनिवार’ या उपक्रमांतर्गत जाकादेवी येथील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्याचा उपक्रमही त्यांनी हाती घेतला आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भावना समजून घेणे आणि त्यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे, भावना प्रभावीपणे व्यक्त करणे, रागावर नियंत्रण ठेवणे, कलेची साधना कशी करावी, अंगभूत कलागुण विकसित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये कोणती, तसेच जिज्ञासा आणि आत्मविश्वास कसा वाढवावा, याबाबत महेंद्र कदम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना केवळ कलाक्षेत्राची माहिती मिळत नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त दिशा मिळत आहे.
पुस्तकांची देणगी आणि विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन मोरे, शाळेचे सीईओ किशोर पाटील, संस्थेचे सचिव विनायक राऊत आणि संस्थेचे चेअरमन सुनील उर्फ बंधू मयेकर यांनी महेंद्र कदम व वैशाली कदम यांचे विशेष आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यात वाचनसंस्कृती, सर्जनशीलता, जिज्ञासा आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून, महेंद्र कदम दाम्पत्याने केलेली पुस्तकांची देणगी आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

