(मुंबई / वृत्तसंस्था)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पुनर्विकास कामासाठी सुरू असलेल्या ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला मध्य रेल्वेने ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. रेल्वे विकास प्राधिकरणामार्फत (RLDA) सुरू असलेल्या कामांच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरील ब्लॉकचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन दादर आणि ठाणे स्थानकांवर सुरू राहणार आहे.
सीएसएमटीच्या महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ येथे पायाभूत सुविधा तसेच संरचनात्मक कामे सुरू आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या ब्लॉकमुळे काही गाड्यांना सीएसएमटीपर्यंत जाता येणार नसून त्यांचा प्रवास दादर किंवा ठाणे स्थानकावरच संपणार आहे.
दादर येथे शॉर्ट टर्मिनेशन होणाऱ्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक १२८१० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२११२ अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक २२१२० मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस यांचा समावेश आहे.
तर गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेसचे शॉर्ट टर्मिनेशन ठाणे स्थानकावर करण्यात येणार आहे. या चारही गाड्यांच्या शॉर्ट टर्मिनेशनचा निर्णय ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.
सीएसएमटीच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत स्थानकाचे आधुनिकीकरण, पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याच्या दृष्टीने ही कामे केली जात आहेत. कामांमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

