( ठाणे / कराड )
ठाण्यातील जलसंधारण विभागातील अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या हत्येप्रकरणी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन त्यांचा खून घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ही घटना ६ जून रोजी कराड परिसरात घडली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिस तपासातून हा नियोजित खून असल्याचे उघड झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत अभियंत्याची पत्नी सारिका मंडले हिने तिच्या २५ वर्षीय प्रियकर प्रथमेश थोरात (रा. कार्वे, ता. कराड) याच्यासोबत मिळून कट रचला. या कामासाठी तिने तीन लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानंतर आकाश होनसुरे (२३, रा. कल्पतरू कॉलनी, थोरात हॉस्पिटलजवळ, कराड) आणि इतर साथीदारांच्या मदतीने हत्या करण्यात आली.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित प्रथमेश थोरात याचे महिलांच्या कपड्यांच्या कापड व्यवसायाशी संबंधित दुकान असल्याने त्याची सारिका मंडले हिच्याशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, सारिका आणि प्रथमेश यांचे मागील सुमारे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, पती लक्ष्मण मंडले हे सारिका हिला मानसिक त्रास देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच कारणातून प्रथमेश थोरातच्या मदतीने सारिका मंडले हिने पतीचा काटा काढण्याचा कट रचल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.
योजना अत्यंत थंड डोक्याने आखण्यात आली होती. लक्ष्मण मंडले ठाण्याहून सुट्टीवर आल्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर नजर ठेवली. कोल्हापूर नाका परिसरात ते पायी जात असताना कारने त्यांना धडक देण्यात आली. त्यानंतर पुन्हा मागे येऊन कारने चिरडून मृत्यू निश्चित करण्यात आला, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. अपघात भासावा म्हणून अल्टो कारचा वापर करण्यात आला होता. ही कार काही दिवस आधीच या कटासाठी खरेदी करण्यात आली होती.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर पोलिसांनी चौकशीची दिशा बदलली. त्यानंतर पत्नी आणि तिच्या भावाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान संपूर्ण कटाचा उलगडा झाला. सध्या या प्रकरणात पत्नी, तिचा प्रियकर आणि दोन कॉन्ट्रॅक्ट किलर अशा चौघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

