( मुंबई )
NEET पेपर लीक प्रकरणानंतर जाहीर करण्यात आलेल्या NEET पुनर्परीक्षेमुळे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतला आहे. याआधी टीईटी परीक्षा 21 जून रोजी होणार होती. मात्र त्याच दिवशी NEET पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आल्याने परीक्षा केंद्रांवर ताण आणि व्यवस्थापनात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन परिषदेनं आता TET परीक्षा 28 जून 2026 रोजी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
टीईटी परीक्षेचं नवं वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, TET पेपर क्रमांक 1 हा 28 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे. तर पेपर क्रमांक 2 दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 या वेळेत घेतला जाणार आहे. उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र 9 जून ते 28 जूनदरम्यान डाउनलोड करता येणार असल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे.
NEET आणि TET एकाच दिवशी आल्याने बदल
NEET पुनर्परीक्षेची तारीख 21 जून जाहीर झाल्यानंतर राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर ताण वाढण्याची शक्यता होती. दोन्ही परीक्षांसाठी बहुतांश केंद्रे समान असल्याने प्रशासन आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकला असता. त्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन TET परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं परिषदेनं सांगितलं.
टीईटी पात्रता आता अनिवार्य
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षक भरतीसाठी TET पात्रता अनिवार्य करण्यात आली आहे. मागील TET परीक्षेत सुमारे 50 हजार उमेदवार पात्र ठरले होते. मात्र अजूनही अनेक उमेदवार पात्रता मिळवू शकले नसल्याने नव्या परीक्षेची तयारी सुरू आहे.
अर्ज भरताना उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
राज्य परीक्षा परिषदेनं उमेदवारांना अर्ज प्रक्रियेबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
- अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने आणि इंग्रजी भाषेत भरावा लागणार
- दहावी, बारावी, व्यावसायिक पात्रता, जात प्रमाणपत्र आणि दिव्यांगत्वाची माहिती मूळ कागदपत्रांनुसार भरावी लागणार
- नवीन रंगीत फोटो, स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र आणि ओळखपत्र स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक
- दोन्ही पेपर देणाऱ्या उमेदवारांनी एकाच अर्जात दोन्ही स्तर निवडावेत
- शुल्क भरल्यानंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही
TET गैरप्रकारातील उमेदवारांना बंदी
2018 आणि 2019 मधील TET गैरप्रकारात सहभागी असलेल्या उमेदवारांना यंदाच्या परीक्षेसाठी अर्ज करता येणार नसल्याचंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. अधिक माहिती आणि शासन निर्णयासाठी उमेदवारांनी mahatet.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असं आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आलं आहे.

