(पंढरपूर / वृत्तसंस्था)
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यासह देशभरातून लाखो वारकरी आणि भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात आणि विठूनामाच्या अखंड गजरात पंढरी भक्तिमय वातावरणाने भारावून गेली आहे. दिवस-रात्र अखंड सुरू असलेल्या दर्शन व्यवस्थेबरोबरच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात करण्यात आलेली दिमाखदार विद्युत रोषणाई भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. सूर्यास्तानंतर संपूर्ण मंदिर परिसर विविधरंगी प्रकाशाने उजळून निघत असून, हा अलौकिक नजारा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
यंदाच्या आषाढी यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिर परिसराला देण्यात आलेले देखणे आणि आधुनिक प्रकाशसौंदर्य. सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन व संवर्धनाचे काम वेगाने सुरू असून, या कामामुळे मंदिराला त्याचे मूळ स्थापत्य वैभव पुन्हा प्राप्त होत आहे. प्राचीन वास्तुकलेचे सौंदर्य अधिक खुलून दिसत असतानाच आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात भर पडली आहे.
विशेषतः श्री विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यावरील कळसावर करण्यात आलेली आकर्षक प्रकाशसजावट भाविकांच्या नजरा खिळवून ठेवत आहे. कळसदर्शनासाठी येणारे हजारो वारकरी आणि पर्यटक या मोहक दृश्याचे मोबाईल आणि कॅमेऱ्यात छायाचित्रण करत आहेत. अनेक भाविकांसाठी ही रोषणाई आषाढी यात्रेतील संस्मरणीय आकर्षण ठरत आहे.
अत्याधुनिक एलईडी तंत्रज्ञानाचा वापर
मंदिर परिसरातील विद्युत सजावटीसाठी अत्याधुनिक एलईडी माळा, रोप लाईट, आकर्षक लटकन, सजावटीची तोरणे, व्हाईट आणि वॉर्म फोकस लाईट्स तसेच विविध डेकोरेटिव्ह लाईट आर्टिकल्सचा वापर करण्यात आला आहे. पारंपरिक मंदिर वास्तूला धक्का न लावता आधुनिक प्रकाशयोजनेच्या माध्यमातून मंदिराचे सौंदर्य अधिक खुलविण्यात आले आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
विद्युत रोषणाई उभारताना भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. संपूर्ण विद्युत यंत्रणा अत्याधुनिक सुरक्षा मानकांनुसार बसविण्यात आली असून, आवश्यक संरक्षक उपकरणे आणि तांत्रिक उपाययोजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षित तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून २४ तास विद्युत व्यवस्थेवर देखरेख ठेवली जात आहे, त्यामुळे लाखो भाविक सुरक्षितपणे या रोषणाईचा आनंद घेत आहेत. ही संपूर्ण आकर्षक विद्युत रोषणाई श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
संपूर्ण परिसर भक्तिमय प्रकाशाने उजळला
फक्त मुख्य मंदिरच नव्हे, तर श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप तसेच मंदिर परिसरातील विविध इमारतींनाही आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी सायंकाळी प्रकाशाच्या झगमगाटात न्हाऊन निघत असून, भक्ती, परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम भाविकांना अनुभवायला मिळत आहे.
यंदाच्या आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनाबरोबरच मंदिर परिसरातील भव्य रोषणाईही भाविकांसाठी एक अविस्मरणीय आकर्षण ठरत असून, पंढरपूरच्या आध्यात्मिक वातावरणात या प्रकाशोत्सवामुळे आणखी भर पडली आहे.

