( ठाणे )
वसईतील पेल्हार, सोपारा फाटा परिसरात मुंबई हायवेच्या कडेला झुडपात गोणीत सापडलेल्या शिरविरहित मृतदेहाच्या प्रकरणाचा अवघ्या 8 तासांत उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, मृताची ओळख अशोक सिंग राजपूत (वय 32, मूळ राजस्थान) अशी पटली आहे. या प्रकरणी दिनेशकुमार कानाराग प्रजापती (वय 27) आणि संदीप ब्रम्हदेव तिवारी (वय 35, विरार) यांना अटक करण्यात आली आहे.
घटनास्थळी तपास करताना पोलिसांनी परिसरातील संशयित वाहनांची माहिती गोळा केली. त्यावरून दिनेशकुमार प्रजापती याला जाबरपाडा येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारासह मित्राचा खून केल्याची कबुली दिली. तपासात उघड झाले की, मृत अशोक सिंग आणि आरोपी दिनेशकुमार यांच्यात किराणा व्यवसायात भागीदारी होती. आर्थिक वादातून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. याच वादातून आरोपींनी धारदार शस्त्राने अशोक सिंगचा खून केला. खून केल्यानंतर मृताची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याचे शिर धडापासून वेगळे केले. मृतदेह झुडपात टाकण्यात आला, तर शिर तानसा नदी/खाडी परिसरात फेकण्यात आले.
पोलिसांनी तत्काळ ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम राबवून नदीकाठाजवळील झाडाझुडपातून मृताचे शिर, मोबाईल फोन आणि इतर पुरावे जप्त केले. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने सर्व पुरावे सुरक्षित करण्यात आले आहेत. या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत उलगडा केल्यामुळे पेल्हार गुन्हे शाखा पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

