(संगमेश्वर / एजाज पटेल)
नालासोपारा येथे झालेल्या ‘क्षितिजोत्सवा’त शिव स्वराज्य महिला गोविंदा पथकाने दमदार कामगिरी करत पाच थरांचा मनोरा अवघ्या १ मिनिट १ सेकंदात पूर्ण केला. न्यू विवा कॉलेजच्या प्रांगणात १६ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत आठ बलाढ्य संघांच्या आव्हानावर मात करत पथकाने अंतिम फेरीत प्रवेश केला. या यशात संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावची लेक प्राजक्ता सुनील बोमे हिची कामगिरी विशेष ठरली. पाचव्या थरावर चढत तिने पथकाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्राजक्ताने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही गोविंदा पथकातील सहभाग आणि सराव सुरू ठेवत आपल्या जिद्दीचे दर्शन घडवले. पाचव्या थरावर चढण्याची जबाबदारी तिच्यावर असताना तिने आत्मविश्वासाने ही कामगिरी पूर्ण केली. तिच्या या कामगिरीनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे कौतुक केले.
प्राजक्ता बोमे हिचे कुटुंब मूळचे संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावचे आहे. तिचे आई-वडील हॉटेलमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी प्रयत्न सुरू ठेवले. प्राजक्ताने आठवीपर्यंतचे शिक्षण कोंडये येथे पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ती नालासोपारा येथे आत्याकडे राहू लागली असून सध्या अकरावीत शिक्षण घेत आहे.
गोविंदा पथकात सहभागी होण्याची तिची इच्छा मात्र सुरुवातीला आई-वडिलांना मान्य नव्हती. साहसी खेळातील धोका आणि मुलीच्या सुरक्षिततेची चिंता यामुळे त्यांनी तिला विरोध केला. मात्र, प्राजक्ताची या खेळाविषयीची आवड आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द कायम होती. घरातून विरोध असतानाही ‘फक्त हंडी बघायला जाते’ असे सांगून ती सरावासाठी जात होती. सातत्याने सराव करत तिने पथकातील आपली जबाबदारी आत्मविश्वासाने पार पाडली आणि अखेर पाचव्या थरावर चढून आपली क्षमता सिद्ध केली.
पथकाने ६१ सेकंदांत पाच थरांचा मनोरा पूर्ण करत अंतिम फेरी गाठल्याने प्राजक्ताच्या कुटुंबीयांसह कोंडये ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत प्राजक्ताने मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तिच्या कामगिरीमुळे कोंडये गावासह संगमेश्वर तालुक्याचे नावही उज्ज्वल झाले आहे.
प्राजक्ता बोमे म्हणाली, “माझ्या आई-वडिलांनी हॉटेलमध्ये दिवस-रात्र कष्ट करून मला घडवले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने आणि गोविंदा पथकातील खेळातील धोका पाहून सुरुवातीला घरातून विरोध होता. मात्र, गोविंदा उत्सवात सहभागी होऊन काहीतरी करून दाखवण्याची माझी जिद्द होती. त्यामुळे नालासोपारा येथे आत्याकडे राहत असताना मी छुप्या पद्धतीने सराव करत होते. पथकाने अवघ्या ६१ सेकंदांत पाच थर पूर्ण केले आणि मी पाचव्या थरावर उभी राहिले, तो क्षण माझ्यासाठी अत्यंत भावूक होता. माझ्या या यशातून आई-वडिलांच्या कष्टाचे आणि आत्याने दिलेल्या विश्वासाचे चीज झाले, याचा मला आनंद आहे. कोंडये गावाचे आणि नालासोपाऱ्याचे नाव उज्ज्वल करता आले, याचा अभिमान वाटतो. हा अंतिम फेरीचा टप्पा आहे. अंतिम सामन्यातही चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
आता आगामी अंतिम फेरीकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले असून, शिव स्वराज्य महिला गोविंदा पथकाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्राजक्ता आणि तिच्या सहकाऱ्यांची जिद्द पुन्हा एकदा कसोटीला लागणार आहे.

