(देवळे / प्रकाश चाळके)
साखरपा ते रत्नागिरी दरम्यान नियमित धावणारी सकाळी ७.३० वाजताची एसटी बस गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आल्याने कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, रुग्ण तसेच नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. ही बस तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी साखरपा परिसरातील प्रवाशांकडून होत आहे.
अतिवृष्टीमुळे आंबा घाटातील वाहतूक विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर साखरपा ते रत्नागिरी सकाळची बससेवा अचानक बंद करण्यात आली. मात्र, या निर्णयामुळे दररोज रत्नागिरी येथे कार्यालयीन कामासाठी, शिक्षणासाठी तसेच अन्य कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बससेवा बंद करण्याबाबत आगाराकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांकडे एसटीचे मासिक पास आहेत. मात्र, देवरूख आगारातून काढलेला पास कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये काही वाहकांकडून स्वीकारला जात नसल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या पासधारकांना पास असूनही अतिरिक्त तिकीट काढावे लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
देवरूख आगारातून काढलेला मासिक पास कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील बसमध्ये का स्वीकारला जात नाही, याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून पासधारक प्रवाशांना स्पष्ट नियम आणि योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे. तसेच साखरपा-रत्नागिरी सकाळची ७.३० वाजताची एसटी तातडीने सुरू करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात आली आहे.

