(संगमेश्वर /प्रतिनिधी)
कोसुंब-ताम्हाणे मार्गावरील सिमेचीवाडी येथे ट्रक आणि मोटरसायकलची भीषण धडक होऊन प्रतीक सावंत (३३) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या अपघाताने केवळ एका कुटुंबाचा आधार हिरावला नाही, तर कोकणातील बेकायदा चिरे वाहतुकीचा बेदरकार कारभारही पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. अपघातग्रस्त ट्रकची कागदपत्रेच २०२४ मध्ये कालबाह्य झाल्याचे समोर आल्यानंतरही असे वाहन रस्त्यावर धावत होते तरी कोणाच्या आशीर्वादाने, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
प्रतीकच्या मृत्यूची वार्ता समजताच आंबवली आणि परिसरातील शेकडो ग्रामस्थ देवरूख पोलीस ठाण्याबाहेर एकवटले. केवळ अपघातास कारणीभूत ठरलेल्या चालकावर कारवाई करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न होऊ नये, तर बेकायदा चिरे वाहतुकीमागील मूळ सूत्रधारांवरही हातोडा पडला पाहिजे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. ट्रक मालकावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली. पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा होऊनही सुरुवातीला ठोस आश्वासन न मिळाल्याने संताप अधिकच उफाळला. अखेर ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयाकडे मोर्चा वळविला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी अनधिकृत चिरे वाहतूक तातडीने थांबवावी, नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या वाहतुकीची चौकशी करावी आणि या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रकची तपासणी केली असता वाहनाच्या वैधतेबाबत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ट्रकचा पीयूसी, योग्यता प्रमाणपत्र अर्थात फिटनेस, विमा तसेच परवाना यांची वैधता २०२४ मध्येच संपल्याचे निष्पन्न झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कागदपत्रांची वैधता संपलेले वाहन रस्त्यावरून सर्रास धावत असेल, तर तपासणी यंत्रणा नेमकी करीत काय होती? पावसाळ्यात चिरेखाणी बंद ठेवण्याचे नियम असताना चिरे वाहतूक सुरूच कशी? अशा वाहनांना रस्त्यावर धावण्याची मुभा कोण देत आहे? या प्रश्नांनी आता संबंधित यंत्रणांनाही संशयाच्या भोवऱ्यात उभे केले आहे. ग्रामस्थांचा वाढता दबाव आणि संतप्त वातावरण पाहता अखेर पोलिसांनी ट्रक मालक वैशाली साठे यांच्या विरोधात मोटार वाहन कायद्यानुसार देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मालकावरही कायदेशीर कारवाई झाल्यानंतरच नातेवाईकांनी गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास प्रतीकचा मृतदेह ताब्यात घेतला.
प्रतीक सावंतचा मृत्यू हा केवळ रस्ते अपघात म्हणून दुर्लक्षित करण्यासारखा प्रकार नाही. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची कागदपत्रे, त्यांची फिटनेस तपासणी, बेकायदा चिरे वाहतूक आणि संबंधित यंत्रणांच्या कथित दुर्लक्षाचा प्रश्न या घटनेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे. नियम कागदावर आणि बेदरकार वाहतूक रस्त्यावर, अशी परिस्थिती कायम राहिली तर आणखी किती प्रतीक सावंत या निष्काळजीपणाचे बळी ठरणार, हा प्रश्न आता प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवरूख पोलीस करीत आहेत.

