(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात अवैध मटका जुगाराला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान मंडणगड आणि दापोली येथे दोन स्वतंत्र ठिकाणी मटका जुगार सुरू असल्याचे आढळून आले. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी कारवाई करून दोघांविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियमातील कलम १२(अ) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. कारवाईत एकूण ३ हजार २६० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
मंडणगड येथील शासकीय गोडाऊनच्या पाठीमागे ५ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १२.५२ वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन गोविंद दिवेकर (४२, रा. पाट धुत्रोली, मंडणगड) हा कथितरीत्या बेकायदा व विनापरवाना कल्याण मटका जुगाराचा खेळ चालवत होता. लोकांकडून पैसे स्वीकारत असताना तो पोलिसांना मिळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कारवाईत २ हजार २०० रुपयांची रोकड आणि इतर जुगाराचे साहित्य, असा एकूण २ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक अनिरुद्ध राजवैद्य (२८८) यांनी फिर्याद दिली आहे.
दरम्यान, दापोलीतही मटका जुगाराविरोधात कारवाई करण्यात आली. दापोली एसटी बसस्थानकासमोर असलेल्या स्वागत हॉटेलच्या मागील बाजूस, स्टेपीन बारजवळ ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३५ वाजता ही कारवाई झाली. तुकाराम नारायण जुवळे (३५, रा. दापोली, आदर्श शाळेजवळ) हा लोकांकडून पैसे स्वीकारून कथितरीत्या विनापरवाना मटका जुगार चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत १ हजार ५० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल जगदीश सुरेश आंबवणे (४६२) यांनी फिर्याद दिली. या दोन्ही घटनांप्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधित प्रकरणांचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


