(मुंबई / वृत्तसंस्था)
मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि दादरमधील प्रभाग क्रमांक 191 मधून निवडून आलेल्या विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या नगरसेवक पदावरही संकट निर्माण झाले असून, याबाबत लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात निर्णय होण्याची शक्यता आहे.
विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय आता महानगरपालिका सभागृहासमोर मांडला जाणार आहे. त्यानंतर पीठासीन अधिकारी त्यांच्या नगरसेवक पदाबाबत अंतिम निर्णय जाहीर करतील. जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने नियमानुसार त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दादरच्या प्रभाग क्रमांक 191 मधील निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. या निवडणुकीत माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता विशाखा राऊत यांचे पद रद्द झाल्यास पुढील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, विशाखा राऊत यांनी जात प्रमाणपत्राबाबत आपल्याकडे जुने पुरावे असल्याचा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्याकडे आजोबांच्या काळापासूनचे जात प्रमाणपत्राचे पुरावे असून 1911 पासूनची कागदपत्रे आणि मोडी लिपीतील पुरावेही उपलब्ध आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असल्याचा आरोप करत आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुसरीकडे, शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय कोणत्याही दबावामुळे झालेला नसल्याचे म्हटले आहे. संबंधित समिती निष्पक्षपणे काम करते. आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्यामुळे कारवाई झाली असावी, असा दावा त्यांनी केला.
मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मात्र या निर्णयामागे सरकारी दबाव असल्याचा आरोप केला. जात प्रमाणपत्रांच्या प्रकरणांमध्ये निर्णयाला अनेक वर्षे लागतात, मात्र विशाखा राऊत यांच्या प्रकरणात निकाल लवकर लागल्याचा दावा त्यांनी केला. या निर्णयाविरोधात संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यास निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रिया सरवणकर यांना उर्वरित कालावधीसाठी संधी मिळू शकते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित कायदेशीर आणि महानगरपालिका प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विशाखा राऊत या निर्णयाविरोधात कोणती कायदेशीर भूमिका घेतात आणि पुढील सुनावण्यांमध्ये काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

