(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर आज (शुक्रवारी) घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. डोंगराच्या कड्यावर गेलेल्या 18 वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या वडिलांचा दरीत पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर शोक अनावर झालेल्या आईनेही डोंगरावरून खाली उडी घेतल्याने तिचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुणाल मुरलीधर चांदवडे (वय 18), मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळाई (सातारा) परिसरातील कुणाल चांदवडे शुक्रवारी सकाळी सुमारे 10 वाजता तिसगाव येथील खवड्या डोंगरावर गेला होता. तो डोंगराच्या कड्यावर उभा राहिल्याचे समजल्यानंतर त्याचे आई-वडील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही तेथे पोहोचले.
कुणालला डोंगरावरून खाली उडी मारू नये, यासाठी तब्बल तीन तास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो वारंवार आपली जागा बदलत होता आणि आईशी संवाद साधत होता. ग्रामस्थ तसेच पोलीस त्याला समजावत होते. मात्र, तो कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल जवळपास तीन तास डोंगराच्या कड्यावर होता. त्याला जीवन संपवू नये, आई-वडिलांचा विचार करावा, भविष्यातील संधींचा विचार करावा, अशी विनंती करण्यात आली. मात्र, तो सतत नकार देत होता.
तिसगावच्या सरपंचांनी या घटनेबाबत सांगितले की, कुणाल वारंवार जागा बदलत होता. मात्र, तो आईशी बोलत होता. दुपारी एक वाजेपर्यंत त्याला समजावण्याचे प्रयत्न सुरू होते. आम्ही कुणालला अनेकदा विनवणी केली; मात्र, तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सुरुवातीला त्याचे वडील डोंगराच्या खाली होते, तर आई वर उभी राहून त्याची समजूत काढत होती. घटनेच्या शेवटच्या १५ ते २० मिनिटांत त्याचे वडीलही वर आले. ते कुणालला बोलण्यात गुंतवून ठेवतील, असे आम्हाला वाटले. मात्र, वडील मुलाला पकडण्यासाठी पुढे गेले आणि त्याच्यासह तेही खाली पडले. त्यांच्यापाठोपाठ आईनेही खाली उडी मारली, असे सरपंचांनी सांगितले.
मुलाला पकडून वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच कुणालने डोंगराच्या कड्यावरून स्वतःला खाली झोकून दिले. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात मुरलीधर यांचाही तोल गेला आणि दोघेही दरीत कोसळले. उंचावरून खाली पडल्याने दोघांचाही मृत्यू झाला.
मुलगा आणि पती डोळ्यांदेखत दरीत कोसळल्याचे पाहून संगीता चांदवडे यांनाही मोठा धक्का बसला. त्यानंतर धावत जात त्यांनीही डोंगरावरून खाली उडी घेतली. या घटनेत त्यांचाही मृत्यू झाला. अवघ्या काही क्षणांत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाल्याने घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ आणि बचाव पथकातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला.
कुणालने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरगुती कारणावरुनच ही घटना घडल्याचा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे तिसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

