(चिपळूण / वार्ताहर)
चिपळूण शहरातील शंकरवाडी परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहित परिचारिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेमुळे चिपळूणसह देवरूख परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृणाली प्रफुल्ल खेराडे (वय २७, रा. शंकरवाडी, चिपळूण) असे मृत परिचारिकेचे नाव आहे. त्यांचे माहेर देवरूख येथील भुवड कॉलनीत असून, त्या मंडणगड तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या.
मृणाली खेराडे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
आज ( मंगळवार ) सायंकाळी चिपळूण शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती आणि चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.


