(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखेची विशेष सभा कविवर्य केशवसुत स्मारक सभागृहात नुकतीच संपन्न झाली. या सभेत रत्नागिरी येथे 23, 24 व 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अभिजात भाषा आंतरराष्ट्रीय परिषदेसह 27, 28 व 29 नोव्हेंबर रोजी मालगुंड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या केंद्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा घेण्यात आली. अभिजात भाषा आंतरराष्ट्रीय परिषदेला कोमसाप मालगुंड शाखेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबत यावेळी चर्चा झाली. 25 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या या परिषदेला विविध राज्यांतील अकरा भाषांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या प्रतिनिधींसह सुमारे अडीचशे ते तीनशे मान्यवरांची टीम कविवर्य केशवसुत स्मारक, मालगुंड येथे दाखल होणार असल्याने त्यांचे जल्लोषी आणि खास कोकणी पद्धतीने स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले.
कोमसाप मालगुंड शाखेच्या वतीने या मान्यवरांचे दिमाखदार आदरातिथ्य करण्याबरोबरच कोकणच्या संस्कृतीशी निगडित पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी आवश्यक तयारीबाबतही सभेत चर्चा करण्यात आली. यानंतर नोव्हेंबर महिन्यात मालगुंड येथे होणाऱ्या केंद्रीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय मराठी साहित्य संमेलनाचे बिगुल वाजले असून, या संमेलनासाठी कोमसाप मालगुंड शाखेच्या वतीने करण्यात येणाऱ्या तयारीची आखणी करण्यात आली. यापूर्वी सन 2011 मध्ये केंद्रीय मराठी साहित्य संमेलन मालगुंड येथे झाले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा हा सन्मान मालगुंड येथील कविवर्य केशवसुत स्मारकाला मिळाला असल्याची माहिती कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी दिली.
‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमांतर्गत मालगुंड गावात नवीन दालने सुरू करण्याबाबतही सभेत चर्चा करण्यात आली. ज्या ठिकाणी नवीन दालने सुरू होणार आहेत, त्या संबंधित दालनधारकांना आवश्यक माहिती देऊन दालने सुरू करण्यासाठी योग्य ती तयारी हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी नवीन दालनधारकांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
त्यानंतर कोमसापच्या नियोजित विविध उपक्रमांबाबत चर्चा करून त्यांचे नियोजन करण्यात आले. या सभेला कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, मालगुंड कोमसाप शाखेचे सचिव विलास राणे, कोमसाप दक्षिण युवा शक्तीचे प्रमुख अरूण मोर्ये, रामानंद लिमये, डॉ. संतोष केळकर, हनुमंत कदम, वैभव पवार, मोरेश्वर मुळ्ये, कोमसाप सदस्या शुभदा मुळये, उज्वला बापट, गणपतीपुळे भक्तनिवासचे व्यवस्थापक अजिंक्य जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


