(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर मधील लोवले मयूरबाग येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय यश संतोष पडये या मुलाचा अखेर मुंबईत सुखरूप शोध लागला आहे. सुरुवातीला अपहरणाचा संशय व्यक्त केला जात असला तरी, आई-वडील रागावल्याने यशने रागाच्या भरात कोणालाही न सांगता घर सोडल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे काही दिवस चिंतेत असलेल्या पडये कुटुंबीयांसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
लोवले मयूरबाग येथील संतोष काशीराम पडये यांचा मुलगा यश संतोष पडये (इयत्ता सहावी) हा ११ मे २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अचानक घरातून बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे तसेच परिसरात शोध घेतला, मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नव्हता.
ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलगा अचानक गायब झाल्याने अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गावित आणि त्यांच्या पथकाने युद्धपातळीवर तपास सुरू केला होता. विविध दिशांनी शोध सुरू असतानाच या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले.
घराची आठवण येताच वडिलांना केला फोन
घरातून निघालेला यश थेट मुंबईत पोहोचला होता. काही दिवस मुंबईत राहिल्यानंतर त्याला घराची आणि आई-वडिलांची आठवण आली. त्याने थेट वडिलांच्या मोबाईलवर फोन करून आपण सुखरूप असल्याची माहिती दिली.
मुलाचा आवाज ऐकताच पडये कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. यशने दिलेल्या माहितीनुसार वडिलांनी मुंबईतील मुलुंड येथे राहणाऱ्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईकांनी तत्काळ संबंधित ठिकाणी जाऊन यशला ताब्यात घेतले.
दुचाकी, ट्रक आणि रेल्वेने गाठली मुंबई
यशने घरातून निघाल्यानंतर केलेला प्रवास ऐकून पोलीस आणि कुटुंबीयही थक्क झाले. आई-वडील ओरडल्याच्या रागातून तो घराबाहेर पडला. मयूरबाग येथून त्याने एका अनोळखी दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेत संगमेश्वर गाठले. त्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकला हात दाखवत तो खेडमधील लोटे परशुराम येथे पोहोचला. तेथून रेल्वे स्थानक गाठून रेल्वेने तो थेट मुंबईत पोहोचला. अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने केलेला हा प्रवास अत्यंत धक्कादायक आणि थरारक असल्याची चर्चा होत आहे.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालकांच्या ताब्यात
मुंबईतून यशला सुखरूप संगमेश्वर येथे आणल्यानंतर नियमानुसार त्याला बालकल्याण समिती आणि बालसुधारगृहाच्या ताब्यात देण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संगमेश्वर पोलिसांच्या उपस्थितीत यशला अधिकृतपणे त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणात संगमेश्वर पोलिसांनी केलेल्या तत्पर तपास आणि समन्वयाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

