(संगमेश्वर / एजाज पटेल)
रत्नागिरी–सिंधुदुर्ग तलाठी संघटना, तालुका संगमेश्वर यांची सन २०२६ साठीची नवीन कार्यकारिणी शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ रोजी बिनविरोध निवडली गेली. अत्यंत शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि ऐक्याच्या वातावरणात पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत कोणताही विरोध न झाल्याने संघटनेतील एकजूट व विश्वास अधोरेखित झाला.
या निवडीत अध्यक्षपदी श्री. संदेश घाग भाऊसाहेब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संगमेश्वर तालुक्यात सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली असून, याआधी त्यांनी रत्नागिरी तालुका तलाठी संघटनेचे चार वेळा अध्यक्षपद भूषविले आहे. संघटन कौशल्य, अनुभवसंपन्न नेतृत्व आणि प्रशासनाशी समन्वयाची भूमिका यामुळे जिल्हा पातळीवर त्यांचे नेतृत्व सर्वमान्य मानले जाते. त्यांच्या याच अनुभवावर विश्वास ठेवत संगमेश्वर तालुक्यातील तलाठी बांधवांनी पुन्हा एकदा त्यांची एकमताने निवड केली आहे.
नवनियुक्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष : श्री. संदेश घाग (भाऊसाहेब)
उपाध्यक्ष : मं. अ. श्री. सागर करंबेळे (भाऊसाहेब), श्रीमती तांबे मॅडम
सचिव : मं. अ. श्री. महेश माने (भाऊसाहेब)
सह सचिव : श्रीमती प्रज्ञा काईंगडे
खजिनदार : मं. अ. श्री. सोहन वीर (भाऊसाहेब)
सह खजिनदार : श्री. शीतल कदम
सल्लागार : श्री. रोहित पाठक (भाऊसाहेब), श्री. ए. जी. कदम (भाऊसाहेब)
या निवड प्रक्रियेत जिल्हा सल्लागार श्री. अमर चाळके (भाऊसाहेब) यांनी अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पारदर्शक, नियमबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडली.
तलाठी बांधवांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देणार – संदेश घाग
निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष संदेश घाग भाऊसाहेब म्हणाले, “संगमेश्वर तालुक्यातील तलाठी बांधवांनी माझ्यावर पुन्हा एकदा दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. ही निवड वैयक्तिक यश नसून तलाठी कुटुंबाच्या एकजुटीचा विजय आहे. रत्नागिरी तालुक्यात चार वेळा अध्यक्ष म्हणून काम करताना तलाठी बांधवांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा मला जवळून समजल्या आहेत.”
ते पुढे म्हणाले, “त्याच अनुभवाच्या बळावर संगमेश्वर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न, वेतनविषयक बाबी, वाढता कामाचा ताण, प्रशासकीय अडचणी आणि न्याय्य हक्क यांसाठी शासनदरबारी ठाम, संघटित आणि सकारात्मक भूमिका मांडली जाईल. सर्वांना विश्वासात घेऊन संघटना अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावी करण्याचा माझा निर्धार आहे.”
नवनियुक्त कार्यकारिणी तलाठी बांधवांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन संघटनेचे कार्य अधिक गतिमान करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या बिनविरोध निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

