(राजापूर / वार्ताहर)
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, राजापूर आणि समर्थ नगर जलतरण क्लब, समर्थ नगर यांच्या संयुक्त विद्यमाने शतकपूर्ती महोत्सवानिमित्त गुरुवर्य कै. आनंद भावे यांच्या स्मरणार्थ रविवार, २३ ऑगस्ट रोजी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थ नगर येथील मारुती मंदिर तळी येथे ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेत १२, १४, १६ व १८ वर्षांखालील तसेच खुल्या गटातील मुले व मुलींना सहभागी होता येणार आहे. प्रत्येक वयोगटासाठी ५० मीटर आणि १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्थानिक जलतरणपटूंना प्रोत्साहन देतानाच नवोदित खेळाडूंना स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धकांनी रविवारी सकाळी ८ वाजता स्पर्धास्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि मेडल देऊन गौरविण्यात येणार असून, सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेतील पंचांचा निर्णय अंतिम राहणार असून, स्पर्धेच्या नियोजनासंदर्भातील सर्व अधिकार आयोजकांकडे राहतील.
दरम्यान, पावसाअभावी मारुती मंदिर तळीतील पाण्याची पातळी कमी राहिल्यास स्पर्धेच्या नियोजनात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत अंतिम निर्णय आयोजक घेतील. स्पर्धेसाठी प्रति स्पर्धक ५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या जलतरणपटूंनी शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ पर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी अभय भावे (७५५९४८६६९९), उदय खडपे (७२१८१२०४२३), दीपक कोदलकर (७७६७८२३६७९) आणि महेश मयेकर (९४२२४२५७४०) यांच्याशी संपर्क साधावा.
राजापूर तालुक्यातील जलतरणपटू, पालक आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि समर्थ नगर जलतरण क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

