(राजापूर/ रत्नागिरी)
घरातील मंडळी बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचा मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. दोन्ही बेडरूममधील कपाटे उचकटून त्यातील सुमारे १२ हजार रुपये किमतीची चांदीची भांडी लंपास केल्याची घटना राजापूर तालुक्यातील नाणार-भटवाडी येथे शनिवारी (२६ सप्टेंबर) दिवसा घडली.
या प्रकरणी लता वासुदेव साईम (६५, सेवानिवृत्त, रा. नाणार-भटवाडी, ता. राजापूर) यांनी नाटे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ३३१(३), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९.४५ ते दुपारी ३.३० या कालावधीत अज्ञात चोरट्याने साईम यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर घरात बेकायदेशीररीत्या प्रवेश करून दोन्ही बेडरूममधील कपाटे उचकटली. कपाटांमधील सामान अस्ताव्यस्त करून चोरट्याने चांदीच्या वस्तू घेऊन पोबारा केला.
चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये सुमारे ४ हजार ५०० रुपये किमतीचे एक वाटी असलेले चांदीचे हळदी-कुंकवाचे भांडे आणि ७ हजार ५०० रुपये किमतीचे गोल आकाराचे चांदीचे निरंजन यांचा समावेश आहे. चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे १२ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दिवसा घरफोडी झाल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी नाटे पोलिसांकडून तपास सुरू असून, परिसरातील हालचाली आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


