(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर शहरासह तालुक्यात मोकाट गुरांचा वाढता त्रास आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्तरीय समित्या गठीत करणे आणि पशुसंवर्धन विभागामार्फत गुरांचे १००% इअर-टॅगिंग करण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांनी स्पष्ट केले की, “मोकाट गुरांचा प्रश्न हा केवळ प्रशासनाचा नसून तो सर्वांचा आहे. त्यामुळे या समस्येच्या निराकरणासाठी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाने एकत्र येणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार मोकाट गुरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाईही केली जाईल.”
राजापूर शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच ग्रामीण भागात मोकाट गुरांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी तातडीने बैठक घेण्याची सूचना प्रशासनाला दिली होती.
बैठकीला तहसिलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी श्री. जाधव, पोलिस निरीक्षक अमित यादव, पशुधन विकास अधिकारी डॉ. वैभव चोपडे, नगरपालिकेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता सुप्रिया पोतदार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चर्चेदरम्यान अरविंद लांजेकर, तालुकाप्रमुख दीपक नागले, प्रकाश कुवळेकर, भाजपचे रविंद्र नागरेकर, फारूख साखरकर, मनोहर गुरव, दिवाकर आडविरकर, आजीम जैतापकर, मंदार ढेवळे यांसारख्या कार्यकर्त्यांनी उपाययोजनांची गरज अधोरेखित केली.
या वेळी पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी कायदेशीर कारवाईच्या शक्यता मांडल्या, तर डॉ. चोपडे यांनी इअर-टॅगिंगद्वारे गुरांच्या मालकांचा शोध घेण्याची पद्धत स्पष्ट केली. पालिकेच्या वतीने सुप्रिया पोतदार यांनी मोकाट गुरांवर आधीपासून सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली.
शेवटी, ग्रामसभांद्वारे ग्रामस्तरीय समित्या गठीत करून गुरांच्या मालकांचा शोध घेणे आणि कायदेशीर कारवाईसाठी सहकार्य करणे यावर सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. तसेच पशुसंवर्धन विभागाने सर्व गुरांचे शंभर टक्के इअर-टॅगिंग करण्याचे ठरले.

