(राजापूर / वार्ताहर)
स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण होऊनही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या कळसवली येथील सुवरेवाडीतील ग्रामस्थांचा संघर्ष अद्याप कायम आहे. पक्का रस्ता नाही, पऱ्यावर कॉजवे नाही आणि पावसाळ्यात संपर्क तुटतो. त्यामुळे एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी आजही ‘डोली’चा आधार घ्यावा लागत आहे. विकासाच्या गप्पा आणि आधुनिक सुविधांच्या दाव्यांमध्ये सुवरेवाडीतील वास्तव मात्र संतापजनक असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
‘ब्राह्मणदेव संघर्ष सेवा मंडळ’ आणि स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तरळवाडी (रिंगीचा पर्या) ते ब्राह्मणदेवाचे कोंड असा सुमारे २.६ किलोमीटर लांबीचा आणि आठ फूट रुंदीचा हा मुख्य संपर्कमार्ग आहे. या रस्त्याची अधिकृत नोंद गाव नमुना क्रमांक २६ मध्ये असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे, तर रस्त्याच्या कामासाठी १४ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या ग्रामसभेत जा. क्र. ८३/१९-२० अन्वये ठरावही करण्यात आला आहे. मात्र, ठराव होऊन अनेक वर्षे उलटली तरी प्रत्यक्षात रस्त्याची समस्या कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पावसाळा सुरू झाला की सुवरेवाडीचा बाहेरील जगाशी संपर्क जवळपास तुटतो. ‘रिंगीचा पर्या’ येथे पाण्याची पातळी वाढली की मार्ग बंद होतो. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागतो. सर्वात गंभीर बाब म्हणजे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणेही कठीण होते. परिणामी रुग्णाला डोलीतून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्याची वेळ ग्रामस्थांवर येते.
या मार्गाचा मोठा भाग घनदाट जंगलातून जात असल्याने शाळकरी मुले, महिला आणि वयोवृद्धांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याची दुरवस्था आणि पावसाळ्यातील अडथळ्यांमुळे नागरिकांना सातत्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मूलभूत सुविधांचा अभाव इतका गंभीर झाला आहे की, अनेक कुटुंबे गाव सोडून शहरांकडे स्थलांतर करण्याच्या स्थितीत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. काही घरांना कुलपे लागली असून, रस्त्याअभावी गावातील सामाजिक आणि आर्थिक जीवनावरही परिणाम होत आहे.
ग्रामपंचायतीकडून निधीअभावी आमदारांकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. ‘ब्राह्मणदेव संघर्ष सेवा मंडळ’ आणि ग्रामस्थांनी आमदार किरण (भैया) सामंत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. मात्र, निवेदनांनंतरही प्रत्यक्ष कामाला गती मिळत नसल्याने ग्रामस्थांचा संताप वाढत आहे.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता सुवरेवाडीतील वस्तुस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तरळवाडी ते ब्राह्मणदेवाचे कोंड या मार्गाचे तातडीने खडीकरण व डांबरीकरण करावे, तसेच ‘रिंगीचा पर्या’ येथे आरसीसी कॉजवे उभारून पावसाळ्यातील संपर्क तुटण्याची समस्या कायमची दूर करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
‘डिजिटल इंडिया’ आणि विकासाच्या युगातही एखाद्या रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी डोलीचा आधार घ्यावा लागत असेल, तर हा केवळ रस्त्याचा प्रश्न नसून प्रशासनाच्या विकासकामांवरील गांभीर्याचा प्रश्न आहे. त्यामुळे सुवरेवाडीतील ग्रामस्थांच्या या वर्षानुवर्षांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, अन्यथा ग्रामस्थांचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ‘सुंदर गाव’ योजनेअंतर्गत २०२३-२४ मध्ये कळसवली ग्रामपंचायतीने रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत तब्बल ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. तसेच या वर्षी देखील “सुंदर गाव” पण पुरस्कार मिळाला आहे. मात्र, याच कळसवलीतील सुवरेवाडीतील ग्रामस्थांना आजही पक्का रस्ता आणि पऱ्यावरील कॉजवेअभावी रुग्णांना डोलीतून नेण्याची वेळ येत असल्याने विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

