(रत्नागिरी / वार्ताहर)
मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित कोंकण विभाग क्र. ४ आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या महिला संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकासह विजेतेपद पटकावले. सलग तिसऱ्या वर्षी अजिंक्यपद मिळवत महिला संघाने विजेतेपदाची हॅट्रिक साधली. पुरुष संघानेही उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदकावर नाव कोरले.
कोंकण विभाग आणि डॉ. आबासाहेब मराठे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, हातिवले, ता. राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कोंकण विभाग क्र. ४ आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवला.
सुवर्णपदक विजेत्या महिला संघात श्रुती फणसे (एम.ए. भाग-२), चार्वी कापडी (द्वितीय वर्ष वाणिज्य), तन्वी घाणेकर (एम.कॉम. भाग-१), श्रावणी शिंदे (द्वितीय वर्ष बायोटेक) आणि गौरवी गावडे (द्वितीय वर्ष बायोटेक) यांचा समावेश होता.
पुरुष संघानेही स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत कांस्यपदकासह तृतीय क्रमांक मिळवला. पुरुष संघात सिद्धेश फणसेकर (एम.कॉम. भाग-१), अथर्व कारेकर (एम.बी.ए.), आदित्य शिर्के (तृतीय वर्ष विज्ञान), परेश तळेकर (एम.बी.ए.), शौनक भावे (एम.कॉम. भाग-२), आकाश पालवे (प्रथम वर्ष कला) आणि सलील कांबळे (प्रथम वर्ष वाणिज्य) यांचा सहभाग होता.
महाविद्यालयाच्या महिला व पुरुष बॅडमिंटन संघांना क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन, तसेच क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके आणि श्री. माधव फणसे यांचे सहकार्य लाभले.
महिला संघाने मिळवलेल्या सलग तिसऱ्या विजेतेपदाबद्दल तसेच कांस्यपदक मिळवणाऱ्या पुरुष संघाचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे, प्राध्यापक, कर्मचारी व सेवक यांनी अभिनंदन केले. पुढील स्पर्धांसाठी संघांना शुभेच्छाही देण्यात आल्या.

