(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुकातील सर्वात मोठी आणि ‘स्मार्ट ग्रामपंचायत’ पुरस्काराने सन्मानित झालेली पाचल ग्रामपंचायत यांच्या वतीने गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाचल पेठवाडी येथील हनुमान नाट्य मंदिरात सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
पाचल गावातील बालकलाकार व शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ग्रामपंचायत पाचल दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करते. यंदाही अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रम रंगतदार केला.
यावेळी बोलताना ग्रामपंचायत पाचलचे सरपंच बाबालाल फरास यांनी सांगितले की, पाचल ग्रामपंचायतीने नेहमीच शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. लहान मुलांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्य अपेक्षा मासये आणि समीक्षा वाफेळकर यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वर्षीच्या स्पर्धेत विद्यानगर, कोंडवाडी, दिवाळवाडी, श्रावस्ती नगर, गुरववाडी, नारकरवाडी, घारेवाडी, मुस्लिमवाडी, हनुमान नगर, धनगरवाडी, पांगरी पुनर्वसन व पेठवाडी येथील अंगणवाड्यांचे बालकलाकार सहभागी झाले होते. तसेच जि. प. शाळा पाचल क्रमांक १, २, ३ व ५, जि. प. आदर्श शाळा पाचल, आदर्श उर्दू शाळा आणि गणेश विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांनीही सादरीकरण केले.
स्पर्धेच्या निकालात जि. प. उर्दू शाळा पाचलने प्रथम क्रमांक पटकावला. गणेश विद्या मंदिर जि. प. शाळा पाचल क्रमांक ५ यांना द्वितीय, तर जि. प. आदर्श शाळा पाचल व जि. प. शाळा पाचल क्रमांक २ यांना संयुक्त तृतीय क्रमांक देण्यात आला.
या कार्यक्रमास सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व कर्मचारी, तसेच नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षक म्हणून भगवान जाधव यांनी काम पाहिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपसरपंच आत्माराम सुतार यांनी मानले.


