(रत्नागिरी / वार्ताहर)
जिल्ह्यात बोगस, बनावट तसेच निकृष्ट दर्जाची खते, कीटकनाशके आणि अन्य कृषी औषधांची विक्री होऊ नये, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र गुणनियंत्रक पथकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पथकामार्फत जिल्ह्यातील खत व कृषी औषध विक्री केंद्रांची नियमित तपासणी करण्यात येणार असून, नियमबाह्य विक्री अथवा निकृष्ट दर्जाची कृषी निविष्ठा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती महेश नाटेकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात नुकतीच कृषी समितीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा कृषी विकास अधिकारी अभिजित गडदे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजना, कृषी निविष्ठांचा पुरवठा आणि आगामी नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांना दर्जेदार खते, कीटकनाशके आणि अन्य कृषी औषधे योग्य दरात व अधिकृत माध्यमातून उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची किंवा नियमबाह्य पद्धतीने कृषी उत्पादने विकली गेल्यास त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी गुणनियंत्रक पथकाच्या माध्यमातून खत व औषध विक्री केंद्रांना नियमित भेटी देऊन तपासणी करण्यात येणार आहे.
या तपासणीदरम्यान संबंधित दुकानांमधील खत व कृषी औषधांचा साठा, उपलब्ध उत्पादनांची गुणवत्ता, विक्री प्रक्रिया तसेच आवश्यक परवानग्या आणि नोंदींची पडताळणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन किंवा अनियमितता आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे सभापती महेश नाटेकर यांनी स्पष्ट केले.
बैठकीच्या प्रारंभी कृषी विभागाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना लवकरच शेती अवजारांचे वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची माहिती घेण्यात आली. तसेच जिल्ह्यातील खतसाठ्याचाही आढावा घेण्यात आला. सध्या जिल्ह्यात खताचा पुरेसा साठा उपलब्ध असून, आगामी काळात शेतकऱ्यांना खताची कमतरता भासणार नाही, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
दरम्यान, यापुढे शेतकऱ्यांना खत विक्रीची प्रक्रिया अधिकाधिक ऑनलाइन पद्धतीने करण्यावर भर देण्यात येणार आहे. ऑनलाइन विक्रीमुळे खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्याबरोबरच उपलब्ध साठा, विक्रीचे प्रमाण आणि प्रत्यक्ष वितरणावर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे.
स्वतंत्र गुणनियंत्रक पथकाची नियमित तपासणी आणि ऑनलाइन खत विक्रीच्या माध्यमातून कृषी निविष्ठांच्या वितरण प्रक्रियेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे बोगस अथवा निकृष्ट कृषी निविष्ठांच्या विक्रीला आळा बसून शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

