(गणपतीपुळे / वैभव पवार)
मालगुंड येथील आदर्श जीवन शिक्षण शाळा (मालगुंड नं. १) मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘आनंद बाजार’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन बुधवारी २१ जानेवारी रोजी करण्यात आले होते. शाळा व्यवस्थापन समिती आणि शतकोत्तर अमृत महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंचे स्टॉल उभारून प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव घेतला. खाद्यपदार्थांसह दैनंदिन वापरातील वस्तूंची विक्री करताना विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. पैशांची देवाणघेवाण, आर्थिक व्यवहार, ग्राहक सेवा अशा महत्त्वाच्या व्यवहारिक कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाला.
आनंद बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि आत्मविश्वासाचे विशेष कौतुक केले. सर्वांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आणि उपक्रम अधिक यशस्वी ठरला.
शाळेचा शतकोत्तर अमृत महोत्सव यंदा विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा केला जात असून, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे, आत्मविश्वास वाढावा आणि शिकताना आनंद मिळावा हा या आनंद बाजारामागील मुख्य उद्देश होता. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रोवली जातात आणि भविष्यात सक्षम व कणखर नागरिक घडण्यास मदत होते, असे मत उपस्थित पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केले.
या उपक्रमाचे मालगुंड परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, विद्यार्थ्यांसाठी ‘आनंद बाजार’ हा एक संस्मरणीय आणि शिकवण देणारा अनुभव ठरला.

