(मुंबई / वृत्तसंस्था)
मुंबईच्या कुर्ला परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जेसीबी मशीन उचलताना मोठी दुर्घटना घडली. क्रेनच्या सहाय्याने जेसीबी मशीन हवेत उचलत असताना अचानक क्रेन आणि जेसीबी दोन्ही खाली कोसळले. क्रेनचा काही भाग दोन घरांवर आदळल्यानंतर रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळला. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार आठ ते दहा जण जखमी झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, मध्य रेल्वेकडून दोन जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
पहाटे सुमारे ३ वाजून ४० मिनिटांनी कुरेशी नगर परिसरात ही दुर्घटना घडली. कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. याच कामादरम्यान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेसीबी मशीन हलवण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येत होता. क्रेनने जेसीबी मशीन बऱ्याच उंचीवर उचलल्यानंतर अचानक त्याचा तोल गेला आणि क्रेनसह जेसीबी खाली कोसळले.
क्रेनचा एक भाग जवळच्या दोन घरांवर आदळला आणि त्यानंतर रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळला. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठा आवाज झाला. अपघातात एका कारसह ऑटो-रिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनेनंतर मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अवाढव्य क्रेन हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, दुर्घटनेच्या ठिकाणापासून रेल्वे ट्रॅक जवळच आहे. या मार्गाचा वापर प्रामुख्याने मध्य रेल्वेच्या मालगाड्यांसाठी केला जातो. त्यामुळे लोकल रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर क्रेन कोसळल्याने ती हटवण्याचे काम आव्हानात्मक ठरले आहे.
क्रेन ओव्हरहेड वायरवर कोसळल्याची माहिती परिसरात पसरल्यानंतर स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली. ओव्हरहेड वायरमध्ये विद्युत प्रवाह असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या दुर्घटनेत नेमके किती जण जखमी झाले, याबाबत अद्याप अधिकृत आकडा स्पष्ट झालेला नाही. मध्य रेल्वेने दोन जण जखमी झाल्याची माहिती दिली असून, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जखमींची संख्या आठ ते दहा असू शकते. जखमींची प्रकृती आणि दुर्घटनेचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

