(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील शाळांमध्ये अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील १ हजार २७ रिक्त पदांपैकी ४७८ शिक्षक सेवक पदांसाठी पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेअंतर्गत गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषद मुख्यालयात उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. मात्र, पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांपैकी २० जणांनी गैरहजेरी लावल्याचे समोर आले आहे.
शिक्षकांची पदे मोठ्या कालावधीपासून रिक्त असल्याने विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत होता. त्यामुळे शिक्षक भरतीकडे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू झालेल्या या भरतीमुळे ग्रामीण भागातील शाळांना शिक्षक उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कागदपत्र पडताळणीसाठी मराठी माध्यमातील ४५७ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ४३७ उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पडताळणी पूर्ण केली. तर उर्दू माध्यमातील २१ जागांसाठी २० उमेदवार उपस्थित राहिले. अशा प्रकारे एकूण ४५८ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली.
दरम्यान, पडताळणीसाठी अनुपस्थित राहिलेल्या २० उमेदवारांना प्रशासनाने ई-मेलद्वारे दुसरी आणि अंतिम संधी दिली आहे. त्यामुळे या उमेदवारांना आता विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कागदपत्र पडताळणीदरम्यान पाच उमेदवारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे आढळून आले. संबंधित उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या पात्रतेबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
शासन आदेशानंतर समुपदेशनाची तिसरी फेरी
कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होताच पात्र उमेदवारांसाठी समुपदेशनाची तिसरी फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीत पात्र उमेदवारांची निवड निश्चित झाल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील. त्यानंतर संबंधित उमेदवारांना थेट शाळांवर रुजू करून घेण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता काही प्रमाणात दूर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नियुक्तीकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


