(रत्नागिरी / वार्ताहर)
जी.जी.पी.एस. (GGPS) प्रशालेने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ च्या निकालात प्रशालेतील तब्बल ३० विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा कौतुक सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात र. ए. सोसायटीचे सचिव सतीश शेवडे, प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष सुहास भाऊ पटवर्धन, डॉ. केतकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपूर्वा मूरकर, गुरुकुल विभागाचे प्रमुख वासुदेव परांजपे आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख शुभदा पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुंदर स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात अधिक उत्साहपूर्ण झाली. या गीताला शाळेचे शिक्षक विजय रानडे आणि नितीन लिमये यांनी साथ दिली.
मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या यशासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे प्रशालेने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेतील ७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल ६३.०१ टक्के असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कोवळे शौर्य मंदार (४०/११८), देवरुखकर अनन्या सचिन (४३/११८), पवार शौर्य सस्मित (८४/११८), राऊळ भार्गव प्रशांत (९९/११८) आणि कवठणकर मनवा कपिल (११८/११८) यांचा समावेश आहे.
इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेतील ४८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९०.९१ टक्के असल्याचे नमूद करण्यात आले. शहरी सर्वसाधारण यादीत पाटील शिवम विजय (१६/९७), तारवे श्लोक श्याम (३६/९७), पालवणकर सान्वी अमर (४९/९७), कुलकर्णी चैत्राली आनंद (५६/९७), शिंदे आराध्या शिरीष (६१/९७), कुलकर्णी आराध्या मंदार (६२/९७), चव्हाण सोहम रत्नदीप (६८/९७), आयरे श्रीरंग मनोज (७९/९७) आणि मुळ्ये राधेय योगेश (९२/९७) या विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले.
इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत १०२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ७४.२५ टक्के लागला. गुणवत्ता यादीत सृष्टी संदीप पाटील (१४/११८), स्वरा राजेंद्र पवार (४७/११८), अथर्व विकास सारदळ (६०/११८), स्वरा सदानंद आग्रे (८०/११८), कनक संतोष सातवेकर (८३/११८), शौर्या निलेश देसाई (८९/११८), मिहिरा प्रमोद कांबळे (९०/११८), साध्वी स्नेहराज साळुंखे (१००/११८) आणि खुशी निलेश पाटील (१०२/११८) या नऊ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेतील ६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ५८.४६ टक्के लागला. गुणवत्ता यादीत श्रीतेज दीपक माळी (३/९७), सोहम सदानंद आग्रे (१५/९७), आर्य सस्मित पवार (२६/९७), शल्वि प्रदीप शिवगण (२७/९७), चैतन्य विवेक नवरे (३९/९७) आणि तनिष प्रशांत मायनाक (४९/९७) या सहा विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले.
शिष्यवृत्ती परीक्षेतील या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. पालकांनीही मनोगत व्यक्त करताना प्रशालेच्या शैक्षणिक कार्याचे आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मार्गदर्शनाचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात र. ए. सोसायटीचे सचिव सतीश शेवडे यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित असून, यापुढील शैक्षणिक वाटचालीतही विद्यार्थ्यांनी अशीच कामगिरी करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या दैदिप्यमान यशाबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, शाळा समितीचे अध्यक्ष मंदार गाडगीळ आणि गुरुकुल शाळा समितीच्या अध्यक्ष प्राचीताई जोशी यांनीही सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षया सावंत आणि वैदेही सुर्वे यांनी केले. शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे जी.जी.पी.एस. प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

