(रत्नागिरी)
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतीत प्रलंबित आणि वाद दाखलपूर्व अशा एकूण ४ हजार ३२६ प्रकरणांचा सामोपचाराने यशस्वी निपटारा करण्यात आला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद वाय. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत पार पडली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीची माहिती दिली.
लोकअदालतीदरम्यान जिल्ह्यातील विविध न्यायालयांमधील प्रलंबित तसेच दाखलपूर्व स्वरूपातील हजारो प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यामध्ये प्रलंबित असलेल्या एकूण ३ हजार ८७२ प्रकरणांपैकी १५२ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली. तर वाद दाखलपूर्व (Pre-Litigation) स्वरूपातील १५ हजार ३४० प्रकरणांपैकी तब्बल ४ हजार १७४ प्रकरणांमध्ये यशस्वी तोडगा काढण्यात आला.
या लोकअदालतीत दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेश अनादर (Cheque Bounce) प्रकरणे, वैवाहिक वाद, बँका व पतसंस्थांच्या वसुलीची प्रकरणे, थकीत वीज बिल तसेच टेलिफोन बिलाशी संबंधित वाद अशा विविध प्रकारच्या प्रकरणांचा समावेश होता. संबंधित पक्षकारांमध्ये समन्वय साधत अनेक वाद सामोपचाराने मिटवण्यात यश आले.
लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी, सर्व तालुका विधी सेवा समित्यांचे न्यायाधीश, विधीज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या माध्यमातून नागरिकांचा वेळ, पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेतील दीर्घकालीन त्रास कमी होण्यास मदत झाली असून न्यायालयांवरील कामकाजाचा ताण हलका करण्यासही हातभार लागला आहे.

