( रत्नागिरी / वार्ताहर )
कुवारबाव परिसरात आज ( मंगळवार) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तीन डंपरचा अपघात झाला. एमआयडीसीकडे जाण्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या डंपरला मागून येणाऱ्या ब्रेक फेल झालेल्या डंपरने जोरदार धडक दिली. त्यानंतर धडक देणारा डंपर मागे सरकत असताना पाठीमागून येणाऱ्या आणखी एका डंपरला धडकला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, तिन्ही डंपरचे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कुवारबाव येथे डंपर क्रमांक एमएच ०८ डीडी ७७९४ हा एमआयडीसी रोडकडे जाण्यासाठी थांबला होता. याचवेळी मागून आलेल्या एमएच ०८ एपी २६३७ या डंपरचे अचानक ब्रेक निकामी झाले. चालक अमीन रेड्डी यांच्या नियंत्रणाबाहेर गेलेल्या या डंपरने पुढे थांबलेल्या डंपरला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर एमएच ०८ एपी २६३७ हा डंपर मागे सरकला. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या एमएच ०८ डब्ल्यू २९०० या तिसऱ्या डंपरला त्याची धडक बसली. त्यामुळे एकापाठोपाठ तीन डंपर या अपघातात सापडले.
या अपघातात तिन्ही डंपरचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अपघातानंतर कुवारबाव परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

